भाजपाची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: May 20, 2017 04:48 AM2017-05-20T04:48:50+5:302017-05-20T04:48:50+5:30
पनवेलमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित महाआघाडीने भाजपासमोर आव्हान निर्माण केले आहे. आमदार प्रशांत
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेलमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित महाआघाडीने भाजपासमोर आव्हान निर्माण केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तर महाआघाडीचे प्रणेते माजी आमदार विवेक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, खारघरमधील गोल्फकोर्स, सिडकोचा नैना प्रकल्प, मेट्रो आदीमुळे पनवेल शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांत चुरस पाहायला मिळत आहे. भाजपाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची व तितकीच प्रतिष्ठेचे ठरली आहे. त्यानुसार भाजपाने प्रचाराचा धडाका लावला आहे. आमदार प्रशांत ठाकूर हे स्वत: प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. हायटेक प्रचारावर अधिक भर देण्यात आला आहे. यात फेसबूक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. त्याचबरोबर दैनंदिन प्रचार रॅली, मंत्री व बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका लावला आहे. त्याला महाआघाडीनेही तोडीस तोड उत्तर देत प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे खरी चुरस भाजपा आणि महाआघाडी यांच्यातच पाहायला मिळत आहे. शेकाप हा स्थानिक पक्ष असल्याने पनवेलच्या ग्रामीण भागात या पक्षाची पाळेमुळे रुजली आहेत. त्यामुळे शेकापची संपूर्ण भिस्त या ग्रामीण भागातील मतदारांवर आहे. त्याचबरोबर शहरी भागातील पारंपरिक मतदारांकडूनही महाआघाडीला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यानुसार शेकापसह महाआघाडीतील घटक पक्षांनीही आक्रमक प्रचारावर भर दिला आहे. तर भाजपाने ग्रामीण व शहरी भागात प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. शहरी भागातील कॉस्मोपॉलिटन मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपासह महाआघाडीनेही आघाडी घेतली आहे.
सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यानुसार भाजपा, महाआघाडीसह शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. शनिवार व रविवार हे शेवटचे दोन दिवस प्रचारासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या दोन दिवसांत अनेक दिग्गजांच्या सभा पनवेलमध्ये होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील प्रचार रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेवटच्या दोन दिवसांत कोण कसा प्रचार करतो, त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. महाआघाडीच्या आक्रमक प्रचार प्रणालीचा भाजपाने काहीसा धसका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांत भाजपाला आणखी जोमाने प्रचारात उतरावे लागणार आहे.
मोदींचा करिष्मा तारणार?
भाजपाने प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छबीचा प्रभावीपणे वापर केला आहे. देशात व राज्यात अजूनही मोदींचा करिष्मा कायम आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विविध निवडणुकीतून हे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीतही हा करिष्मा चालेल, असे भाजपाला वाटते. तर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या विविध निवडणुकीत भाजपाला हार पत्करावी लागली. पनवेलमध्येही हा करिष्मा चालणार नाही, असे महाआघाडीचे मत आहे.