स्थायी समितीमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; उशिरा पोहोचण्याचा सत्ताधाऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:39 PM2020-03-13T23:39:23+5:302020-03-13T23:39:53+5:30

एक दिवसाचे सभापतीपद भूषविले : ३०० कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

BJP's Shiv Sena push in standing committee Defeat the rulers to arrive late | स्थायी समितीमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; उशिरा पोहोचण्याचा सत्ताधाऱ्यांना फटका

स्थायी समितीमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; उशिरा पोहोचण्याचा सत्ताधाऱ्यांना फटका

googlenewsNext

नवी मुंबई : स्थायी समितीच्या सभेला सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक उशिरा पोहोचल्यामुळे शिवसेनेने सभापतीपद बळकावले. पाच मिनिटांमध्ये ३०० कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन भाजपला धक्का दिला. कामकाज बेकायदेशीर असल्याचा दावा भाजपने केला असून सचिवांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे शुक्रवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. ११ तारखेला सभेची नोटीस देताना सभा ११ वाजता होणार असे सर्व सदस्यांना कळविण्यात आले होते. परंतु त्यानंतर सभेची वेळ बदलून सकाळी १० वाजता होणार असल्याचे कळविण्यात आले. शिवसेना व काँगे्रसचे सदस्य वेळेत सभागृहात पोहोचले. अधिकारी व सचिवही पोहोचले, परंतु सत्ताधारी भाजपचे सदस्य व सभापती नवीन गवते सभागृहात आले नव्हते. सभा सुरू करण्यासाठी ५ सदस्य आवश्यक असतात. प्रत्यक्षात ८ सदस्य असल्यामुळे सभेचे कामकाज सुरू करण्याची मागणी शिवसेना सदस्यांनी केली. नगरसेविका सरोज पाटील यांनी सभेचे सभापतीपद रंगनाथ औटी यांनी भूषवावे, अशी सूचना मांडली. बहादूर बिष्ट यांनी अनुमोदन दिले. औटी यांनी सभापतीपद भूषविले व विषय पत्रिकेवरील सर्व ५२ प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवले व सर्वांच्या सहमतीने मंजूर करून सभेचे कामकाज संपविले. शिवसेनेच्या खेळीची माहिती सत्ताधारी भाजपला समजेपर्यंत कामकाज संपले होते. तब्बल ३०० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. या घटनेमुळे महापालिका वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती. स्थायी समितीच्या कामकाजाविषयी भाजपने आक्षेप घेतले आहेत. सभेचे कामकाज ११ वाजता होणार असल्याचे कळविण्यात आले होते. परंतु नंतर सकाळी दहा वाजता सभा होणार असे निश्चित केल्याचे पत्र सर्व सदस्यांना देण्यात आले नाही. सुधारित विषयपत्रिका मिळाल्याच्या बोगस सह्या करण्यात आल्या आहेत. सचिव चित्रा बावीस्कर यांनी चुकीच्या पद्धतीने सभा चालविल्याचा आरोप सभापती नवीन गवते यांनी केला आहे. भाजपने आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेऊन सचिवांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पुन्हा सभा बोलावण्यात येईल, असेही सभापतींनी स्पष्ट केले आहे.

बेलापूरमध्ये होणार बहुमजली वाहनतळ
बेलापूर सेक्टर १५ मधील भूखंड क्रमांक ३९ वर बहुमजली वाहनतळ विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. चार मजली वाहनतळाच्या तळमजल्यावर १२१ मोटारसायकल, ८७ चारचाकी, पहिल्या ते चौथ्या मजल्यावर प्रत्येकी ८० प्रमाणे ४०७ चारचाकी व १२१ मोटारसायकल उभ्या करण्याची सुविधा असणार आहे. ३० कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावासही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

चिंचपाडामधील नाल्याचा प्रस्तावही मंजूर
ऐरोलीतील चिंचपाड्यामधील नाल्याला संरक्षक भिंत व दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मागील स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला होता.
परंतु भाजपने हा प्रस्ताव स्थगित केला होता. ४ कोटी २८ लाख रुपये खर्चाच्या या प्रस्तावासही शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

सभा पुन्हा बोलावणार
शिवसेना सदस्यांनी भाजपला धक्का दिल्यानंतर सभापती नवीन गवते यांनी सभेचे कामकाज नियमाप्रमाणे नसल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी सभा पुन्हा बोलावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे ही सभा पुन्हा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कामकाज नियमाप्रमाणेच
सभेचे कामकाज बेकायदेशीर असल्याचा भाजपचा दावा शिवसेनेने फेटाळला आहे. नियमावलीमध्ये असणाºया तरतुदीप्रमाणे हंगामी सभापती निवडून कामकाज करण्यात आले आहे. सभेसाठी दहा वाजताची वेळ होती. याविषयी प्रशासनाने सर्वांना कळविले होते. सभापती व सत्ताधारी नेहमीच उशिरा सभा सुरू करत असतात. त्यांच्या उशिरा येण्याचे खापर दुसऱ्यांवर फोडू नये, अशा प्रतिक्रियाही शिवसेना नगरसेवकांनी व्यक्त केल्या आहेत.

स्थायी समिती सभागृहात सभापती वेळेवर आले नाहीत. यामुळे नियमाप्रमाणे सदस्यांनी सभापतीपदासाठी माझे नाव सुचविले. शहरातील विकासकामांच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. - रंगनाथ औटी, नगरसेवक शिवसेना

सभेची वेळ ११ वाजता होती. सुधारित वेळेची माहिती सदस्यांना दिली नव्हती. कार्यक्रमपत्रिका मिळाल्याच्या बोगस सह्या करण्यात आल्या आहेत. सभेचे कामकाज बेकायदेशीरपणे करण्यात आले असून या प्रकरणी सचिवांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे.
- नवीन गवते, सभापती स्थायी समिती

Web Title: BJP's Shiv Sena push in standing committee Defeat the rulers to arrive late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.