जेएनपीटीतील कामगारांचा काळा दिन, कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरणाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 01:26 AM2020-12-10T01:26:42+5:302020-12-10T01:45:54+5:30
JNPT News : केंद्र सरकारने जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. खासगीकरणावरच ठाम असलेल्या सरकारने जेएनपीटीचा प्रस्ताव याआधीच धुडकावला आहे. आता स्वेच्छानिवृती योजना सुरू केली आहे.
उरण - जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात बुधवारी कामगारांनी काळा दिन पाळला. काळे कपडे, काळ्या टोप्या, मफलर घालून आणि काळे झेंडे दाखवून कामगारांनी जेएनपीटी, केंद्र सरकारच्या विरोधात प्रशासन भवनासमोरच जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. टर्मिनलचे खासगीकरण रोखण्यासाठी १६ डिसेंबर रोजी खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली.
केंद्र सरकारने जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. खासगीकरणावरच ठाम असलेल्या सरकारने जेएनपीटीचा प्रस्ताव याआधीच धुडकावला आहे. आता स्वेच्छानिवृती योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेलाही कामगारांनी विरोध केला आहे. केंद्र सरकारच्या दबावाला कामगार जुमानत नसल्याने सर्वपक्षीयांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सर्वपक्षीयांनीही खासगीकरणाला विरोध केला आहे. खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी जेएनपीटी बंदरातील कामगार आणि कामगार संघटनांनी जेएनपीटीचे आजी-माजी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, भूषण पाटील, रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कामगारांनी काळा दिन पाळला. यावेळी काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आणि जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांच्या विरोधात घोषणाबाजी करतानाच सेठी यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. बंदराच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच बंदर तोट्यात आले असल्याचा आरोप माजी कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील
यांनी केला.
बंदराच्या खासगीकरण प्रस्तावाविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत कामगार संघर्ष करतील. त्यामुळे जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी मोर्चाआधीच राजीनामा देऊन केंद्राला बंदराचे खासगीकरण न करण्याचा प्रस्ताव सादर करावा.
- दिनेश पाटील, कामगार ट्रस्टी.
जेएनपीटीने कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण न करता स्वत: बंदर चालवावे. यासाठी नवीन क्युसी क्रेन खरेदी करण्याचा प्रस्ताव तत्काळ तयार करावा. बंदर नफ्यात येण्यासाठी कामगार बंदर प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करतील.
- भूषण पाटील, कामगार ट्रस्टी
काळी माती, ढेपळं दिली अध्यक्षांना भेट
ट्रेनिंग सेंटरपासून प्रशासन भवनापर्यंत महिला कामगारांसह सहभागी झालेल्या जेएनपीटी कामगारांनी प्रशासन भवनासमोरच जोरदार घोषणाबाजी केली.
प्रवेशद्वारावरच आंदोलक कामगारांना सीआयएसएफच्या सुरक्षारक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे सुरक्षारक्षक आणि कामगार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मात्र, संतप्त झालेल्या कामगारांनी गेटच्या साखळ्या तोडून प्रशासन भवनात प्रवेश केला.
जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदरासाठी संपादन करण्यात आलेली जमीन कशी होती, ती पाहिलीच नसल्याची टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी जमिनीची काळी माती व ढेपळं अध्यक्षांना भेट म्हणून देण्यात आली.
ढेपळात उगवलेले गवत, टोपल्या पाहून कामगार पुतळा जाळण्याची तयारी करीत असल्याच्या संशयाने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावरून पोलीस आणि कामगार नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. मात्र, हे सर्व जाळण्यासाठी नव्हे, तर जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांना भेट देण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितल्यानंतर वस्तू जप्त करण्यासाठी सरसावलेले पोलिस माघारी फिरले.