डॉक्टरकडून रेमडेसिविरचा काळाबाजार; नवी मुंबईतील दाखल रुग्णांच्या माहितीचा केला गैरवापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 01:24 AM2021-04-25T01:24:37+5:302021-04-25T06:40:14+5:30
राजकीय वरदहस्त
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : उपचाराच्या बहाण्याने रुग्णाच्या नावे रेमडेसिविर इंजेक्शन मागवून त्याची विक्री करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरने हा प्रकार केला आहे. तर रुग्णावर उपचाराच्या बहाण्याने मिळवलेल्या इंजेक्शनची तो प्रत्येकी १२ ते १५ हजारांनी विक्री करत होता.
गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने रेमडेसिविर इंजेक्शनची अवैध विक्री करण्यासाठी आलेल्या हरपिंदर कपूर सिंग याला खारघरमधून अटक होती. त्याच्या अटकेसाठी वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक नीलेश तांबे, ज्ञानेश्वर भेदोडकर, गंगाधर देवडे, विजय चव्हाण, सहायक उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार अतिश कदम, ऊर्मिला बोराडे आदींच्या पथकाने खारघरमध्ये सापळा रचला होता.
सिंग याच्या अटकेनंतर अधिक चौकशीत एक डॉक्टरच इंजेक्शनची वाढीव दराने बेकायदा विक्री करत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी नेरूळ येथील एका कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या कमलाकांत सिंग (२७) या डॉक्टरला अटक केली आहे. चौकशीत त्याने ८ ते १० इंजेक्शनची अवैध विक्री केल्याचे समोर आले आहे. यासाठी तो रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नावाचा वापर करत होता, अशी माहिती समोर आली आहेे.
एखाद्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असल्यास कमलाकांत हा मेडिकलमधून त्या रुग्णाच्या नावे गरजेपेक्षा जास्त इंजेक्शन मागवत असे. त्यानंतर मागवलेले वाढीव इंजेक्शन स्वत:कडे ठेवून त्याची १२ ते १५ हजार रुपयांना विक्री करायचा. यादरम्यान गरजूंसह इंजेक्शनची काळ्या बाजाराने विक्री करणारे रॅकेट त्याच्या संपर्कात आले. कमलाकांत याने त्यांना ८ ते १० इंजेक्शनची प्रत्येकी १२ ते १५ हजार रुपयांना विक्री केल्याचे समोर आले आहे. तर इंजेक्शन घेणारी व्यक्ती स्वतःचा २ ते ५ हजार रुपये फायदा काढून दुसऱ्याला विक्री करत होता. खारघर येथून अटक केलेला हरपिंदर हा त्याच साखळीचा भाग होता.
एपीएमसीमधून महिलेला अटक
वाढीव दराने विक्रीसाठी दोन रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन आलेल्या महिलेला एपीएमसी पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली आहे. जस्मिन जॉन डिसोझा (३८) असे तिचे नाव असून ती ऐरोली सेक्टर ९ येथे राहणारी आहे. एपीएमसी सेक्टर १९ आवारात ती इंजेक्शन विक्रीसाठी आली असता, सापळा रचून तिच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी तिच्याकडे दोन इंजेक्शन व २२ हजारांची रोकड आढळून आली. यावरून तिने यापूर्वीही इंजेक्शन विकले असल्याचा संशय आहे.
कुंपणच खातंय शेत?
रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचे होत असलेले हाल पाहून वैद्यकीय क्षेत्रातीलच काही व्यक्ती इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचा दाट संशय आहे. त्यासाठी रुग्णांच्या नावे इंजेक्शन मागवून मर्जीतील व्यक्तीमार्फत ती गरजूंपर्यंत वाढीव दराने पोहोचवली जात आहेत. यावरून कसलाही त्रास नसलेल्या रुग्णाच्या नावे मागवली जाणारे इंजेक्शन प्रत्यक्षात त्यांना दिले जात आहेत का? याबाबतचा संशय अधिक बळावला आहे.
शुक्रवारीही दोन इंजेक्शन जप्त
शुक्रवारी रात्री कोपर खैरणे सेक्टर १५ येथे एकजण रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी आला होता. याची माहिती मिळताच मनसे पदाधिकारी प्रवीण हंगे, शुभम ईग्वाळे, नितेश नलावडे यांनी त्याला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असतानाच मनसेच्याच एका गटाने त्याला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावरून रेमडेसिव्हीर काळाबाजाराच्या रॅकेटमध्ये अनेकांचे हात गुंतले असून ते खोलवर पसरले असल्याचे स्पष्ट होत आहे.