कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीला जबाबदार असल्याचा ठपका; वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यास नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:45 AM2020-07-27T05:45:43+5:302020-07-27T05:46:02+5:30
महापालिका आयुक्तांची कारवाई :
कमलाकर कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाचा अटकाव करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणे, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आलेल्या अपयशाचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयुक्त बांगर यांच्या या दणक्यामुळे आरोग्य विभागातील अन्य अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या कामात हलगर्जी करणाºया अधिकाºयांची गय केली जाणार नाही. तसेच कोरोना नियंत्रणाच्या कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम आयुक्त बांगर यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत अधिकारी व कर्मचाºयांना दिला होता. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने दिलेले आदेश व नियमांची आरोग्य विभागाकडून सक्षमपणे अंमलबजावणी होत नसल्याची खंतही त्यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्यानुसार पहिल्याच टप्प्यात महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांवरच कारवाईचा आसूड उगारला गेल्याने आयुक्तांच्या या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दरम्यान, आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सोनवणे यांनी या नोटिसीला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. तत्कालीन आयुक्तांनी कोविड नियंत्रणाबाबत कोणतीही जबाबदारी आपल्यावर सोपविली नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आयुक्तांनी उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. राहुल गेठे यांच्याकडे आरोग्य विभागाचे उपायुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. माझ्यावर नॉन कोविड रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ही वस्तुस्थिती असताना शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला मी जबाबदार कसा, असा प्रतिसवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. कोविड नियंत्रणाच्या कामाशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता, असे सोनवणे यांनी प्रशासनाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
उत्तर देण्यासाठी ४८ तासांची मुदत
कोरोना नियंत्रणाच्या कामात झालेला हलगर्जीपणा आणि अँटिजन टेस्ट सुरू करण्यास करण्यात आलेल्या दिरंगाईला जबाबदार धरून आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिसीला ४८ तासांत उत्तर न दिल्यास आपत्कालीन कायद्यातील कलम १८८ नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेच्या नोटिसीला आपण रीतसर उत्तर दिले आहे. कोरोना नियंत्रणाचे काम आपल्याकडे नसताना, अन्य अधिकाºयांच्या अपयशाचा ठपका माझ्यावर ठेवला जात आहे. या अपयशाचे खरे धनी कोण आहेत, त्याचा शोध घेऊन महापालिका आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करावी.
- डॉ. बाळासाहेब सोनवणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका