रक्तदानातून दि. बा. पाटील यांच्या स्मृतीला लाल सलाम
By admin | Published: January 15, 2017 05:42 AM2017-01-15T05:42:23+5:302017-01-15T05:42:23+5:30
हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही व जाऊही द्यायचे नसते, हे विचार भूमिपुत्रांमध्ये रुजविणाऱ्या दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त तरुणाईने रक्तदान करून आदरांजली
नवी मुंबई : हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही व जाऊही द्यायचे नसते, हे विचार भूमिपुत्रांमध्ये रुजविणाऱ्या दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त तरुणाईने रक्तदान करून आदरांजली अर्पण केली. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी रक्त सांडण्याचा व रक्तदानातून रुग्णांचा जीव वाचविण्याचा संकल्प या वेळी भूमिपुत्र तरुणांनी केला.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी वयाच्या ८७व्या वर्षापर्यंत लढा दिला. पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार, राज्याचे विरोधीपक्ष नेते ही पदे भूषविल्यानंतरही दि. बा. यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना कधी बगल दिली नाही व स्वत:च्या फायद्यासाठी तडजोडही केली नाही. यामुळे प्रत्येक प्रकल्पग्रस्तांमध्ये त्यांच्याविषयी आदराचे स्थान आहे. त्यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या वतीने कोपरखैरणेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. दिवसभरामध्ये ८७ तरुणांनी रक्तदान केले व अनेकांनी रक्तदानासाठी नाव नोंदविले आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी स्वत:चे रक्त सांडले. दास्तान फाट्यावर झालेल्या आंदोलनात पाच शेतकरी हुतात्मा झाले. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी हुतात्मा व्हावे लागले, तरी पहिले नाव माझे असेल. वेळ पडली तर रक्तरंजित क्रांती केली जाईल, असा इशारा त्यांनी अनेक वेळा सरकारला दिला होता.
कोपरखैरणेमध्ये आयोजित या कार्यक्रमास आमदार संदीप नाईक, शेतकरी संघटनेचे मोरेश्वर पाटील, दशरथ भगत, शिवराम पाटील, द्वारकानाथ भाईर, हरिश्चंद्र भोईर, ज्ञानेश्वर सुतार, वैजयंती भगत, चंद्रकांत पाटील, नामदेव डाऊरकर, युथ फाऊंडेशनचे निलेश पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. चळवळीतील नेत्याच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल मान्यवरांनी प्रकल्पग्रस्त तरुणांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)
योगायोगाने ८७ रक्तदाते
दि. बा. पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढा दिला. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. प्रकल्पग्रस्त तरुणांनी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १०० तरुणांनी नोंदणी केली होती; पण दिवसभरामध्ये ८७ जणांना रक्तदान करता आले. लोकनेत्यांनी सुरू केलेली चळवळ यापुढे तरुण सुरू ठेवतील. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी वेळ पडल्यास रक्त सांडू व रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवू, असा संकल्प या वेळी करण्यात आला.
सिडकोची आदरांजली
दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, विद्या तांबे, मोहन निनावे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी दि. बा. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.