नवी मुंबई - विचारधारांच्या संघर्षात आपला गड राखून ठेवण्यासाठी क्रूरतेच्या परमोच्च बिंदूवर विराजमान असलेल्या कम्युनिस्टांच्या गडाला त्रिपुरात खिंडार पाडणाऱ्या भाजपाचे सुनील देवधर (प्रभारी-त्रिपुरा) यांनी वाशीतील मॉडर्न कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात त्रिपुरातील रक्तरंजित संघर्षाचा उलगडा केला.देशभरात असहिष्णुतेचे काहूर माजवणारे कम्युनिस्ट स्वत: आपल्या राज्यात किती असहिष्णू आणि हिंसक असतात, याचा पाढाच त्यांनी वाचला आणि अंगावर काटा येतील, असे कम्युनिस्ट हिंसाचाराचे अनेक प्रसंग त्यांनी वर्णन केले. गरिबांची गरिबी कायम राहील याची तजवीज करणे, त्रिपुराला बाह्य जगाशी अलिप्त ठेवून विकासाचे वारेही इथे फिरकू न देणे आणि विरोधकांचे हिंसाचाराने दमन करणे, या त्रिसूत्रीवर हे प्रशासन टिकून असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातून जाऊन त्रिपुरासारख्या राज्यात संघटन उभारणे आणि लोकशाही मार्गाने अपेक्षित परिणामांपर्यंत ते घेऊन जाणे, हे सगळेच अचंबित करणारे असून, त्यामुळे या ठिकाणी कम्युनिस्टांवर केलेली मात सुखावणारी असल्याचे सांगतले. उपस्थितांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. अंत्योदय प्रतिष्ठान व सर्व समाज ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या वेळी अंत्योदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश निकम, नरेंद्र कुमार, शंकर गायकर, सर्व समाज ट्रस्टचे उदयवीर सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाशीत उलगडला त्रिपुरातील रक्तरंजित संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 7:02 AM