पालिकेच्या सीबीएसई शाळेची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 02:17 AM2018-08-05T02:17:59+5:302018-08-05T02:18:03+5:30
महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे व नेरुळ येथे सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्यात आली आहे
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे व नेरुळ येथे सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्यात आली आहे, अशा प्रकारचा शैक्षणिक उपक्रम राबवणारी नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम ठरली आहे. दोन्ही शाळांमध्ये सोमवारपासून पहिलीचे वर्ग सुरू होणार असून, पालकांच्या उत्तम प्रतिसादामुळे प्रतीक्षायादीही वाढत आहे.
पालकांमध्ये सी.बी.एस.ई. शिक्षणाचे वाढते आकर्षण पाहता शहरातील खासगी शाळांमध्ये कमालीची वाढ होत आहे; परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आकारले जाणारे भरमसाठ शुल्क अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे पालिकेने सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती, त्यानुसार कोपरखैरणे सेक्टर ११ व नेरुळ सेक्टर ५० येथे सी.बी.एस.ई. शाळेचे पहिलीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचा शुभारंभ महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आयुक्त डॉ. रामास्वामी एन., उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे याच्या उपस्थितीमध्ये झाला. या प्रसंगी नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने सी.बी.एस.ई. बोर्डाची शाळा सुरू केल्याचे महापौर सुतार यांनी सांगितले.
दोन्ही शाळांच्या इमारती मागील अनेक महिन्यांपासून विविध कारणांनी वादग्रस्त ठरत होत्या, यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर शाळा भरवण्याची मागणी होत होती. त्यानुसार आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी त्याकरिता सकारात्मक पाऊल उचलले होते. त्यानुसार गतमहिन्यात दोन्ही ठिकाणी सी.बी.एस.ई. शाळांचे वर्ग भरवण्याच्या अनुषंगाने शिक्षकभरतीची प्रक्रिया राबवली होती. शिवाय इच्छुक पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार कोपरखैरणेतील शाळेत ५० तर नेरुळच्या शाळेत २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. त्याशिवाय ५० हून अधिक विद्यार्थी प्रतीक्षायादीत आहेत. दोन्ही शाळांमध्ये सोमवारपासून पहिलीचे वर्ग भरण्यास सुरुवात होणार असल्याचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले. सी.बी.एस.ई. शाळा सुरू करणारी नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम, तर देशात दुसरी ठरली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पूर्णपणे अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे, त्याशिवाय कम्प्युटर लॅबही सुरू केली जाणार आहे. पालिकेच्या इतर शाळांप्रमाणचे या सी.बी.एस.ई. शाळांमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांना अमर्यादित आहार पुरवला जाणार असल्याचेही संगवे यांनी सांगितले. नेरुळची शाळा आकांक्षा संस्थेमार्फत चालवली जाणार असून, दोन्ही शाळांवर पूर्णपणे पालिकेचे नियंत्रण राहणार आहे.