नवी मुंबई : बोट उलटून बुडालेल्या वडील व मुलापैकी वडिलाचा मृतदेह दोन दिवसांनी वाशी खाडीमध्ये आढळून आला आहे. दोघेही कांजुरमार्गचे राहणारे असून नेहमीप्रमाणे खाडीमध्ये मासेमारी करताना अतिवृष्टीमध्ये त्यांची बोट उलटली होती. मात्र मुलाचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.२९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये पिता-पुत्र वाहून गेले होते. सदानंद कोळी (५०) व कैलास कोळी (२३) अशी त्यांची नावे असून ते कांजुरमार्गचे राहणारे आहेत. मासेमारी हा त्यांचा व्यवसाय असल्याने घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे बोटीने वाशी खाडीत मासेमारी करत होते. मात्र त्या दिवशी अतिवृष्टीमुळे पाण्यात लाटा तयार होवून त्यांची बोट बुडाल्याची शक्यता वर्तवली जात होती.मासेमारीसाठी गेलेले पिता-पुत्र परत घरी न आल्यामुळे ते हरवल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यानुसार त्यांचा शोध सुरू असतानाच गुरुवारी वाशी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खाडीमध्ये एक मृतदेह आढळून आला.खाडीच्या पाण्यात झाडीमध्ये हा मृतदेह अडकल्याचे रेल्वे प्रवाशांनी पाहिले. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. चौकशीदरम्यान तो मृतदेह सदानंद कोळी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. परंतु कैलास कोळी याच्याविषयी अद्याप पोलिसांना कसलीच माहिती मिळालेली नाही.
बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 2:36 AM