कळंबोली : कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात जन्मत:च मृत पावलेल्या दोन बालकांना बायो मेडिकल वेस्टमध्ये फेकून देण्यात आले. याबाबत नातेवाइकांनी जाब विचारल्यानंतर रुग्णालय प्रशासनाची भंबेरी उडाली. समन्वय नसल्याने हा प्रकार घडल्याची कबुली त्यांनी दिली. या घटनेचा मानसिक धक्का महिलेला बसला आहे.पारगाव येथील रहिवासी सरस्वती मेहर यांना पोटात दुखत असल्याने १६ आॅक्टोबर रोजी कळंबोली एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवार, २४ आॅक्टोबर रोजी पाचव्या महिन्यात प्रसूती झाल्याने दोन्ही बालकांचा मृत्यू झाला. या वेळी नवजात अर्भकांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी प्रफुल्ल मेहर यांनी डॉक्टरांकडे केली होती. मात्र मृतदेह रात्रीच बायो मेडिकल वेस्टमध्ये टाकले. त्यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. मेहर कुटुंबीयांनी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील शर्मा यांना घेराव घातला होता.>माझ्या पत्नीला डॉक्टरांनी धीर देण्याऐवजी घाबरवले होते, तसेच उपचारातही हलगर्जी झाली. आमची दोन्ही बाळे जगू शकली नाही हे दुर्दैव. मात्र, त्यांना कचºयात फेकून देणे, म्हणजे आमच्या भावनांशी खेळ केल्यासारखे आहे.- प्रफुल्ल अनिल मेहर, पीडित
जुळ्या अर्भकांचे मृतदेह फेकले कचऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 4:56 AM