नाल्यामध्ये आढळला महिलेचा मृतदेह
By admin | Published: May 7, 2017 06:29 AM2017-05-07T06:29:07+5:302017-05-07T06:29:07+5:30
शिर व पाय नसलेला अज्ञात महिलेचे धड रबाळे एमआयडीसी येथील नाल्यात आढळून आले आहे. सदर महिलेची
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शिर व पाय नसलेला अज्ञात महिलेचे धड रबाळे एमआयडीसी येथील नाल्यात आढळून आले आहे. सदर महिलेची हत्या करून मृतदेह त्या ठिकाणी टाकण्यात आला असावा, अशी पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
रबाळे एमआयडीसी येथील जुन्या पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील नाल्यात मृतदेह असल्याची माहिती एका भंगार वेचणाऱ्याने पोलिसांना दिली होती. यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. या वेळी तो मृतदेह महिलेचा असून तिचे शिर व पाय कापलेले असल्याचे आढळून आले. मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत असल्याने काही दिवसांपूर्वी तो त्या ठिकाणी टाकलेला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार हत्येचा उलगडा करण्याच्या उद्देशाने रबाळे एमआयडीसी पोलीस व गुन्हे शाखा कक्ष-एकच्या पथकाने घटनास्थळाचा तपास केला. तर नवी मुंबईसह लगतच्या परिसरातून बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती घेऊन मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गतवर्षी तुर्भे एमआयडीसी येथे एका महिलेचा जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला होता. त्यानंतर शनिवारी रबाळे एमआयडीसीमध्ये महिलेचे हे धड सापडले आहे. मृताची ओळख पटू नये या उद्देशाने मारेकरूंनी शिर व पाय धडावेगळे करून ते इतरत्र टाकले असल्याचीही शक्यता आहे. त्यानुसार हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.