मुंबई : आपला लाडका मुलगा सुखरुप मिळेल, या आशेने गेल्या सहा दिवसांपासून गिरगाव चौपाटीवर दिवसरात्र आस लावून बसलेल्या पालघरच्या घिवले येथील मरदे कुटुंबियांच्या पदरी अखेर निराशा पडली. गेल्या सोमवारी बोट उलटून बेपत्ता झालेल्या पाच वर्षाच्या साहिल मरदेचा मृतदेह शनिवारी आढळून आला.
गिरगाव चौपाटीवरील लालबागच्या राजाचे विसर्जन साहिल आपले आई-बाबा, बहिण व मामासमवेत बोटीत बसुन अगदी जवळून पहात होता. बोट उलटल्यानंतर चौघेजण सुखरुप बचाविले. साहिलचा मात्र शोध लागलेला नव्हता. त्याच्या शोधासाठी हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने शोध मोहीम राबविण्यात आली होती. नवसाला पावणाऱ्या लालबागचा राजाचा विसर्जन सोहळा जवळून पाहण्यासाठी २४ सप्टेंबरला गिरगावच्या समुद्रात काही बोटीतून भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी पावणे नऊच्या सुमारास लालबागच्या राजाच्या मूर्तीचे विसर्जन होत असताना एका बोटीचे दुसºया बोटीला धडक बसल्याने ती उलटून जवळपास १५जण पाण्यात पडले. त्यात मरदे कुटूंबाचा समावेश होता. त्यावेळी जीवरक्षक व स्वयंसेवकांनी तातडीने बचाव कार्य करीत त्यांना बाहेर काढले. मात्र साहिल त्यांना मिळाला नव्हता. तो सुखरुप मिळेल, या आशेने गेल्या सहा दिवसापासून पालघरचे मरदे कुटुंबिय, त्यांचे मित्रमंडळी किनाºयावर दिवस रात्र आस लावून बसले होते. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह राजभवनाशेजारील समुद्रकिनाºयावर आढळून आला. ओळख पटल्यानंतर शवविच्छेदन करुन कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला.आईभोवतीचा हात निसटलाविसर्जनावेळी बोट उलटली त्यावेळी साहिल आईला घट्ट बिलगून होता. आईने एका हाताने पाण्यात बुडत असलेल्या मुलीचे केस घट्ट पकडून ठेवले होते,तिला वाचविण्याच्या प्रयत्नात साहिलचा आईभोवतीचा हात निसटून तो पाण्यात बुडाला, त्याला कोणीतरी बाहेर काढल्याचे पाहिल्याचा दावा तिने केला होता. त्याच आशेवर संयम बाळगून सर्वजण शोध घेत होते. मात्र शनिवारी मृतदेह मिळाल्यानंतर मात्र दुखाचा बांध फुटला.