नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:20 AM2018-04-14T03:20:01+5:302018-04-14T03:20:01+5:30
दिघा येथे ठाणे-बेलापूर मार्गालगतच्या नाल्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
नवी मुंबई : दिघा येथे ठाणे-बेलापूर मार्गालगतच्या नाल्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिलेची गळा दाबून हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सिमेन्स कंपनीसमोरील नाल्यामध्ये मृतदेह पडलेला असल्याची माहिती पादचाऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या वेळी सदर मृतदेह महिलेचा असून तिचा गळा दाबून हत्या झाल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले. यानुसार १० एप्रिल रोजी अज्ञाताविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने सदर मृत महिलेची ओळख पटलेली नाही.
साधारण ३० ते ३५ वयाच्या या मृत महिलेच्या उजव्या हाताच्या पोटरीवर सहा पाकळ्यांच्या फुलाचे चित्र गोंदलेले आहे. हा मृतदेह तीन पेक्षा जास्त दिवसांपासून त्या ठिकाणी पडून असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता महिलांची
माहिती मिळवली जात आहे. त्याशिवाय सदर महिलेच्या संदर्भातली योग्य माहिती देणाºयास पोलिसांकडून बक्षीसदेखील घोषित करण्यात आले आहे.