बोगस मतदार २ लाख ३२ हजार
By Admin | Published: July 11, 2015 03:41 AM2015-07-11T03:41:09+5:302015-07-11T03:41:09+5:30
ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये तब्बल २ लाख ३२ हजार ५९१ मतदार बोगस असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या मतदारांचे पत्ते व इतर पुरावे
नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये तब्बल २ लाख ३२ हजार ५९१ मतदार बोगस असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या मतदारांचे पत्ते व इतर पुरावे सापडलेले नाहीत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ही नावे वगळण्यात येणार असून, सर्वच राजकीय पक्षांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे.
निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांनी केला होता. वाशीतील एका प्रभागात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याची तक्रार काँगे्रस पदाधिकारी विजय वाळुंज यांनी केली होती. वाशी सेक्टर १७ मधील एकाच घरात ३० मतदारांचा पत्ता होता. नेरूळमध्ये एका राजकीय कार्यकर्त्याच्या विभागात त्यांच्या मूळ गावातील सर्व नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती. परंतु निवडणुकीच्या गोंधळामध्ये कोणतीही नावे वगळण्यात आली नाहीत. वाशीमध्ये उपमहापौर अविनाश लाड व इतर काही प्रभागामध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त
होती. बोगस मतदार शोधून काढण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.
दुबार नोंदी, मयत, स्थलांतरित मतदार वगळण्यात यावेत असे सूचित केले होते. महापालिकेने नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदार संघातील मतदारांचे सर्वेक्षण केले. मतदार यादीतील नावाबरोबर आधारचा नंबर देण्यास सुरुवात केली. यामध्ये मोठ्याप्रमाणात बोगस नावे निदर्शनास आली. ऐरोली मतदार संघामध्ये तब्बल १ लाख १६ हजार १९७ व बेलापूर मतदार संघामध्ये १ लाख १६ हजार ३९४ नावे आढळून आली आहेत. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत माहितीसाठी ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)