बोगस आधारकार्ड केंद्र उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2015 12:07 AM2015-07-08T00:07:11+5:302015-07-08T00:07:11+5:30
कोणत्याही कागद पत्रांशिवाय ७५० रुपयांमध्ये आधार कार्ड काढून देणाऱ्या महिलेचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीने केला आहे
ठाणे : कोणत्याही कागद पत्रांशिवाय ७५० रुपयांमध्ये आधार कार्ड काढून देणाऱ्या महिलेचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीने केला आहे. तसेच त्या केंद्राची तोडफोड करून व तिला चोप देऊन तिला मंगळवारी पोलिसांच्या हवाली केले.
वागळे इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथे वनिता दुधे या महिलेने आधार केंद्र सुरु केले असून त्याठिकाणी बेकायदेशीररित्या आधार कार्ड काढून देत असल्याची माहिती मनसेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आधार कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे व किती पैसे भरावे लागतील. याची विचारणा केली असता, आधार केंद्र चालविणाऱ्या महिलेने कागद पत्रे असल्यास ३०० रुपये अन नसल्यास ७५० रु पये भरावे लागतील असे सांगितले. यावेळी मनसेच्या महिला शहराध्यक्षा रोहिणी निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनेसच्या शहर सचिव स्मिता साळवी, कोपरी महिला विभागप्रमुख समीक्षा मार्कंडे, सोना कुबल, प्रतिभा जाधव आदी महिला पदाधिकाऱ्यांनी त्या केंद्राची तोडफोड केली. तसेच त्या महिलेला चोप देऊन वागळे पोलिसांच्या हवाली केले.
याप्रकरणी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. तसेच ती याची कुठे नोंद करते. याचा शोध घेत असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली. (प्रतिनिधी)