बोगस डॉक्टरांची होणार चौकशी, सर्वसामान्यांची पिळवणूक थांबविण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 02:42 AM2019-12-28T02:42:40+5:302019-12-28T02:42:49+5:30
स्थायी समितीमध्ये सभापतींचे आदेश : सर्वसामान्यांची पिळवणूक थांबविण्याच्या सूचना
नवी मुंबई : बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. झोपडपट्टी परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. रुग्णांची लूट व फसवणूक थांबविण्यासाठी बोगस डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती सभापतींनी दिले आहेत.
स्थायी समिती बैठकीमध्ये सभापती नवीन गवते यांनी बोगस डॉक्टरांच्या विषयावर लक्ष वेधले. दिघा भागातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेवर शस्त्रक्रिया केली होती. यासाठी लाखो रु पयांचे बिल वसूल करण्यात आले; परंतु आजाराचे निदान झाले नाही.
प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मुंबईच्या जे जे रु ग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले असून, पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली. या दोन शस्त्रक्रियेमुळे सदर महिला अंथरुणाला खिळली आहे. दिघा येथील रु ग्णालयाने फसवणूक केल्याचा आरोप त्या महिलेच्या पतीने केला असून, रु ग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. झोपडपट्टी भागातील अशा रुग्णालयांमध्ये अनेक बोगस डॉक्टर आहेत. त्यांच्यामुळे रु ग्णांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच झोपडपट्टी भागातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूकही केली जात असून, सर्व डॉक्टरांची चौकशी व्हावी, त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र व पदवीही तपासण्यात याव्यात, असे आदेश सभापती गवते यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.
रु ग्णांची फसवणूक होणे ही बाब गंभीर आहे. दिघा येथील संबंधित रु ग्णालय, डॉक्टरांची चौकशी करावी. कागदपत्रांची पडताळणी करावी व या चौकशीचा अहवाल येत्या १५ दिवसांत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांनी स्थायी समिती सभेत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गुन्हा दाखल होऊनही फरक नाही
नेरुळ व दारावे परिसरामध्ये एक बोगस डॉक्टर अनेक वर्षांपासून दवाखाना चालवत आहे. पत्नी डॉक्टर असून दवाखान्यावर पत्नीचे नाव आहे. प्रत्यक्षात तो सकाळी एका ठिकाणी व सायंकाळी दुसºया ठिकाणी स्वत:च रुग्ण तपासत आहे. त्याच्यावरही महापालिकेने यापूर्वी गुन्हा दाखल करून अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरही तो रुग्ण तपासत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यापूर्वी २४ डॉक्टरांवर गुन्हा
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने यापूर्वी शहरातील बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण केले होते. या वेळी जवळपास २४ बोगस डॉक्टर आढळले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून, ते प्रकरण सद्यस्थितीमध्ये न्यायालयामध्ये आहे. सद्यस्थितीमध्ये अजून काही बोगस डॉक्टर शहरात कार्यरत असून, त्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडूनही होऊ लागली आहे.
नेरुळमध्ये झाला होता मृत्यू
नेरुळ सेक्टर ६ सारसोळेमध्ये एक बोगस डॉक्टरने अनेक वर्षांपासून दवाखाना सुरू केला होता. या विभागामध्ये त्याने लोकप्रियताही मिळविली होती. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांशीही चांगले संबंध ठेवले होते. त्याने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे एकाला जीव गमवावा लागला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाली होती.