नवी मुंबई : रायगड जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी सक्षम यंत्रणाच नाही. यामुळे वैद्यकीय पदवी नसतानाही अनेक तोतया डॉक्टर शहरांसह ग्रामीण भागात वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहेत. जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील २४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. मुंबई व इतर महानगरपालिकांमध्येही व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांची नोंदणी केली जाते. त्यांची कागदपत्रे तपासण्यात येत असल्याने बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे पडते. पण रायगड जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच सक्षम यंत्रणा नाही. जिल्ह्याचे क्षेत्रफळ तब्बल ७१४८ हेक्टर असून लोकसंख्या २२ लाखपेक्षा जास्त झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची ५२ आरोग्य केंद्रे व २८८ उपकेंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. १९१९ गावे व ८२१ ग्रामपंचायतींपर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्यात अपयश येवू लागले आहे. यामुळे नागरिकांना खासगी डॉक्टरकडून उपचार करून घेण्यापेक्षा दुसरा पर्याय शिल्लक नाही. चांगले डॉक्टर छोट्या शहरात व ग्रामीण भागात जाण्यास इच्छुक नसतात. याचा गैरफायदा घेवून बोगस डॉक्टर परिसरात व्यवसाय करीत आहे. यापूर्वी पेणमध्ये बोगस एम. डी. डॉक्टरवर कारवाई करण्यात आली होती. पण बोगस डॉक्टरांची संख्या व होणारी कारवाई यामध्ये मोठी तफावत आहे. शासकीय स्तरावरही बोगस डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. महापालिका क्षेत्रात नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्यात येते. आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये छोटा दवाखाना सुरू केला तरी त्याची माहिती पालिकेला देणे बंधनकारक असते. वैद्यकीय पदवी व इतर आवश्यक तपशील पुरविल्यानंतर आरोग्य विभागाच्या समितीच्यावतीने कागदपत्रांची छाननी केली जाते. एखाद्याच्या कागदपत्रामध्ये संशयास्पद वाटल्यास मेडिकल कौन्सिलकडून अधिक माहिती घेतली जाते. नवी मुंबईमध्ये गुन्हे दाखल केल्यानंतरही काही बोगस डॉक्टर पुन्हा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे दवाखाने सील करण्यात आले आहेत. याच धर्तीवर रायगड परिसरात विशेष मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे. पेणमधील धुमाळच्या दोन चित्रफिती उपलब्ध पहिल्या चित्रफितीमध्ये मधुमेह झालेल्याचा डॉक्टरशी संवाद आहे. यामध्ये मधुमेह असला तरी आम्ही किडनी स्टोनच्या आजारावर उपचार करतो. त्यासाठी मधुमेहाची वेगळी औषधे देतो. मगाशी आलेली ती बाई तिलाही मधुमेह आहे. आम्ही तिच्यावर यशस्वी उपचार केल्याचे विश्वास धुमाळ सांगताना दिसत आहे. दुसऱ्या १२ मिनिटांच्या चित्रफितीमध्ये रुग्णाशी उपचार घेताना झालेला संवाद आहे. यावेळी रुग्णास तपासण्याबरोबर त्याला इंजेक्शन देताना व कोणती पथ्ये पाळायची, कशी औषधे घ्यायची याविषयीचा तपशील दिसत आहे. या दोन्ही चित्रफिती जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्या पाहून कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार दीपक दांडेकर यांनी केली आहे. रजिस्टर नंबर बंधनकारक करावा प्रत्येक डॉक्टरने रुग्णालयातील दर्शनी भागात त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. पण अनेक डॉक्टर असे प्रमाणपत्र लावत नाहीत. याशिवाय रुग्णालयाच्या पाटीवर वैद्यकीय पदवीसोबत रजिस्टर नंबर लिहिणे बंधनकारक करण्यात यावे. यामुळे नागरिकांना डॉक्टर बोगस आहे का हे तपासणे सोपे होवू शकते. विशेष सर्वेक्षणाची गरज रायगड जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह महसूल विभागाने थेट ग्रामसेवकांचीही मदत करून प्रत्येक गावातील व शहरातील डॉक्टरांचा तपशील संकलित करावा. जिल्ह्यात ओपीडी सुरू करण्यासाठीही परवानगी घेणे बंधनकारक करावे, अशी मागणी होत आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी कार्यरत आहे. एखाद्या डॉक्टरविषयी तक्रार आल्यास त्या कमिटीकडे पाठविली जाते. संबंधितांच्या कागदपत्रांची छाननी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जाते. नागरिकांना कुठेही बोगस डॉक्टर आढळला तर त्यांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात तक्रार करावी. - डॉ. सचिन देसाई, आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
बोगस डॉक्टरांना रायगडमध्ये आश्रय!
By admin | Published: January 29, 2017 2:26 AM