बोगस माथाडी टोळ्यांना बसणार चाप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:02 AM2019-01-24T01:02:40+5:302019-01-24T01:02:47+5:30
माथाडी कामगारांच्या नावे कंपनी, मॉल व्यवस्थापकांकडून खंडणी उकळणाऱ्या बोगस टोळ्यांवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या नावे कंपनी, मॉल व्यवस्थापकांकडून खंडणी उकळणाऱ्या बोगस टोळ्यांवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अशा टोळ्यांमुळे मूळ कामगारांच्या कामावर परिणाम होत चालला आहे. त्यामुळे या संदर्भात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार मुख्यमंत्र्यांनी बोगस टोळ्यांविरोधात सक्त कारवाईचे संकेत दिले आहेत.
माथाडी कामगारांच्या नावे खंडण्या उकळणाºया टोळ्या शहरात सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याद्वारे बोगस संघटना स्थापन करून कंपन्या व मॉल व्यवस्थापनांना खंडण्यासाठी धमकावले जात आहेत. मूळ माथाडी कामगारांचे काम हिसकावून घेत काम न करता, कंपन्यांकडून ठरावीक कामगारांचे वेतन काढले जात आहे. यामुळे अशा बोगस टोळ्यांच्या माध्यमातून तयार झालेल्या कथित माथाडी नेत्यांकडे करोडोची संपत्ती जमा होत चालली आहे. याचा फटका मूळ माथाडी कामगारांच्या कामावर होत असल्याने, अशा प्रकारच्या नवीन चळवळींना आळा बसला पाहिजे, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी घणसोलीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या नावे खंडण्या उकळणाºयांवर सक्त कारवाईचे संकेत दिले. ज्यांनी माथाडी कामगारांच्या नावे अशी दुकाने मांडली आहेत, त्यांना सोडणार नसल्याचाही इशारा दिला. त्यामुळे शहरातील बोगस माथाडी संघटनांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षांत शहरातील माथाडी कामगारांच्या संघटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी बहुतांश संघटनांचा उद्देश केवळ मॉल व कंपनी चालकांना धमकावण्याचा असल्याचे आजवरच्या घटनांवरून दिसून येत आहे. तर अशा टोळ्यांमध्ये बिगर माथाडी व्यक्तींचाही सहभाग दिसून आलेला आहे. दोन वर्षांपूर्वी एमआयडीसीतल्या व्यावसायिकांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांकडेही बोगस माथाडी संघटनांकडून होत असलेल्या त्रासाची तक्रार केली होती. आर्थिक फायद्यासाठी मूळ माथाडी व बोगस माथाडी कामगारांच्या संघटनांमध्ये वादाचेही प्रकार घडत आहेत. अशाच वादातून सीवूड, वाशी येथील मॉलमध्ये दोन टोळ्यांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही वर्षांपूर्वी माथाडी टोळींच्या वादातून सीवूड येथे एकाची हत्याही झालेली आहे.