नवी मुंबई : भ्रष्टाचार विरोधी आयोगाचे अधिकारी असल्याचे भासवून पानटपरी चालकांकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.जगत नारायण कश्यप, राकेश कमलकुमार कश्यप व कपिल कुमार गुप्ता अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघेही मूळचे मध्यप्रदेशमधील रहिवासी असून सद्यस्थितीमध्ये खारघर व नेरूळमध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांनी सेक्टर २३ मधील जुगनू चौहान यांच्या पानटपरीवर जावून आम्ही दिल्लीमधील अॅन्टी करप्शन कार्यालयातून आलो आहोत. तुम्ही विनापरवाना व्यवसाय करत असून तुमची पानटपरी अनधिकृत आहे. आम्ही टपरी सील करणार असून ती करायची नसेल तर २० हजार रूपये द्या अशी मागणी केली.या तिघांविषयी संशय आल्याने पानटपरी चालकाने व इतर नागरिकांनी तिघांनाही नेरूळ पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी तिघांविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे भ्रष्टाचार विरोधी आयोगाचे अधिकारी असल्याची ओळखपत्रे सापडली आहेत. या तिघांनी अजून कोणाकडून खंडणी मागितली आहे का, या टोळीत अजून कोणाचा समावेश आहे याची पोलीस माहिती घेत आहेत.
बोगस अधिकाऱ्यांना खंडणीप्रकरणी अटक, भ्रष्टाचार विरोधी आयोगाच्या नावे धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:54 AM