खारघरमधील बोगस टंकलेखन केंद्राला टाळे
By admin | Published: July 31, 2015 11:18 PM2015-07-31T23:18:28+5:302015-07-31T23:18:28+5:30
खारघर सेक्टर १२ मध्ये स्कॉलर्स टंकलेखन केंद्र हे बोगस असल्याची तक्रार रायगड जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात लोकमतमध्येही वृत्त प्रसिध्द झाले होते.
पनवेल : खारघर सेक्टर १२ मध्ये स्कॉलर्स टंकलेखन केंद्र हे बोगस असल्याची तक्रार रायगड जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात लोकमतमध्येही वृत्त प्रसिध्द झाले होते. त्याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी या बोगस टंकलेखन केंद्राला टाळे ठोकण्याचे आदेश खारघर पोलिसांना दिले आहेत.
खारघरमधील रहिवासी संजय पाटील यांनी या बोगस संस्थेविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. त्या विरोधात या संस्थेच्या मालकाने न्यायालयात पुनर्याचिका दाखल केले होते. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असल्याची माहिती संजय पाटील यांनी रायगड जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना २२ जून रोजी लिहिलेल्या अर्जात कळविले. याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी हे बोगस केंद्र बंद करण्याचे आदेश खारघर पोलिसांना दिले आहेत. मात्र अचानक हे केंद्र बंद होत असल्यामुळे याठिकाणच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
पनवेल तालुक्यात अशाप्रकारच्या अनेक बोगस संस्था सुरु आहेत. त्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. कमी प्रवेश फी आकारली जात असल्याने अनेक विद्यार्थी बोगस संस्थांमध्ये प्रवेश घेतात.
खारघर पोलिसांना पत्र पाठवून शिक्षण विभागाने संबंधित बोगस टंकलेखन केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येत नसून शिक्षण विभागानेच ते बंद केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)