कोईम्बतूर ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा; पनवेलमध्ये गाडी थांबविली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:19 AM2018-10-22T05:19:37+5:302018-10-22T05:19:44+5:30
कोईम्बतूर ते हिस्सार (राजस्थान) या एक्स्प्रेसला उडविण्याची धमकी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या नावाने देण्यात आली होती.
पनवेल : कोईम्बतूर ते हिस्सार (राजस्थान) या एक्स्प्रेसला उडविण्याची धमकी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या नावाने देण्यात आली होती. या धमकीमुळे रेल्वे प्रशासन, एटीएस व पोलिसांनी ही एक्स्प्रेस पनवेलमध्ये आल्यानंतर तपासणी केली. मात्र, यात संशयास्पद काहीच न आढळल्याने गाडी वसईमार्गे गुजरात, अहमदाबादकडे रवाना झाली. तर दुसरीकडे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पनवेल रेल्वे स्थानकात बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, या बॅगेत कोणतीही बॉम्बसदृश वस्तू नआढळल्याने ती बॅग डिस्पोज करण्यात आली. त्यामुळे पोलीस व श्वान पथकाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
कोईम्बतूर-हिस्सार ही राजस्थानकडे जाणारी रेल्वे गाडी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकात येते. शनिवारी दुपारी सुटलेली गाडी उडविण्याची धमकी लष्कर ए तोयबाच्या नावाने देणारा फोन सकाळी ८ वाजता चेन्नई कंट्रोल येथे आल्यानंतर या धमकीने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. रविवारी दुपारी २.३0च्या सुमारास पनवेल येथे १६ डब्यांची कोईम्बतूर-हिस्सार गाडी पनवेल स्थानकात आल्यानंतर याठिकाणी एटीएस पथके, नवी मुंबई एटीएस, नवी मुंबई बीडीडीएस, मुंबई लोहमार्ग एटीएस, मुंबई लोहमार्ग बीडीडीएस, मुंबई लोहमार्ग क्र ाइम ब्रँच, पनवेल लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाणे, आरपीएफचे जवान, पनवेल शहर पोलीस, खांदेश्वर पोलीस, पनवेल तालुका पोलीस, लोहमार्ग, आरपीएफ आणि नवी मुंबईची एकूण तीन श्वान पथके या ठिकाणी आली. या वेळी रेल्वेची संपूर्ण तपासणी करण्यात आली. मात्र, काहीही संशयास्पद न सापडल्याने अखेर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.