सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत असल्याने त्यांच्या सुरक्षेत कसलीही कसर राहू नये, याकरिता तीन दिवसांपासून बॉम्बशोधक पथक कार्यक्रमस्थळी तळ ठोकून होते. त्यांच्याकडून दिवसात पाचहून अधिक वेळा पाहणी केली जायची. शिवाय, रात्रीच्या वेळी १५हून अधिक अधिकारी टप्प्याटप्प्याने कार्यक्रमाच्या प्रस्तावित जागेला भेट देत होते.ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार होता ते ठिकाण नव्यानेच तयार करण्यात आलेले होते. यापूर्वी त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या टेकड्या व निर्मनुष्य भाग होता. यामुळे विमानतळासाठी तो भाग सपाट करण्याकरिता अनेक महिन्यांपासून परिसरात ब्लास्टिंग केले जात होते. याकरिता वापरण्यात येणारे भूसुरुंग अथवा स्फोटक पदार्थ तिथल्या जमिनीखाली गाडले असल्याचीही शक्यता होती. अशा वेळी जागेच्या पाहणीत थोडासुद्धा निष्काळजीपणा झाल्यास गंभीर परिणामाची शक्यता होती. सुरक्षेत कसलीही कसर राहू नये, याची खबरदारी नवी मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली होती. त्याकरिता मोदींचे आगमन निश्चित होताच पोलिसांनी कार्यक्रमस्थळाच्या मोकळ्या जागेचा ताबा घेतला होता. त्या ठिकाणी तीन दिवस अगोदरच बॉम्बशोधक पथकाच्या तीन तुकड्या तळ ठोकडून होत्या. मेटल डिटेक्टर, श्वानपथक याशिवाय इतरही तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. तर रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांचे १५हून अधिक अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेत होते. याकरिता पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त प्रशांत बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे प्रभारी व गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली. त्याशिवाय वाहतूक उपआयुक्त नितीन पवार, परिमंडळ उपआयुक्त राजेंद्र माने, सुधाकर पठारे यांच्याकडून सातत्याने आढावा बैठका घेतल्या जात होत्या. याशिवाय नियोजनातील आवश्यक सूचना सिडकोला केल्यानंतर होणाºया नियोजनाचाही पोलिसांकडून आढावा घेतला जात होता.कार्यक्रमाच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांवर असताना मदतीला एसआरपीएफच्या दोन तुकड्या घेण्यात आल्या होत्या.
बॉम्बशोधक पथक ३ दिवस तळ ठोकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:50 AM