नवी मुंबई : एमआयडीसीतील बोनसरीमधील नागरिकांनी मागणी करूनही प्रशासनाने नाल्यावर संरक्षण भिंत बांधली नाही, यामुळे यंदाही पावसाचे पाणी घरात घुसून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नवी मुंबई महापालिकेचे नाला व्हिजन बारगळले आहे. एकत्रितपणे सर्व नैसर्गिक नाल्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव जेएनएनयूआरएमने फेटाळला असून, याचा सर्वाधिक फटका एमआयडीसीमधील बोनसरीवासीयांना बसला आहे. या ठिकाणी डोंगराचे पाणी खाडीकडे घेऊन जाणाऱ्या नाल्याचा आकार दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. नाल्याच्या पात्रामध्ये डेब्रिज टाकले जात आहे. काहींनी अतिक्रमणही केले आहे, यामुळे पावसाचे पाणी नाल्याच्या बाहेर येऊन घरांमध्ये घुसू लागले आहे. गतवर्षीही पाणी घरात घुसले आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती; परंतु पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यावर्षी पुन्हा पुराचे संकट निर्माण झाले आहे.
नाल्यामध्ये शौचालयाची टाकी बांधली आहे. वाढीव बांधकामही केले आहे. गतवर्षी एमआयडीसी प्रशासनाने काही बांधकामे हटविली होती; परंतु संबंधितांनी पुन्हा नाल्याच्या दिशेने बांधकाम सुरू केले आहे. भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी स्वत: या परिसराची पाहणी करून संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
बोनसरीमधील नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधावी. येथील पुलाची लांबीही वाढविणे आवश्यक असून, पात्र पूर्वीप्रमाणे रुंद करणे आवश्यक आहे. आयुक्तांनी स्वत: या परिसराची पाहणी करून संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लावावा. - कल्मेश मनगुतकर, स्थानिक रहिवासी