पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:49 AM2019-05-31T01:49:52+5:302019-05-31T01:50:07+5:30
पनवेलमध्ये २१ केंद्रे : ३४१ शाळांमधील पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना होणार वाटप
पनवेल : जिल्हा परिषदेच्या शाळांत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तके दाखल झाली आहेत. लवकरच पनवेलमधील २१ केंद्रामार्फत ती वितरित केली जाणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण ३ लाख ८० हजार पुस्तकांचा यात समावेश आहे.
पनवेल तालुक्यात एकूण ३४१ शाळा आहेत. यामध्ये ११ महापालिकेच्या शाळा, ८२ खासगी विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवगतांचे स्वागत (नवीन विद्यार्थ्यांचे) या उपक्रमाद्वारे पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात दिली जातात. या शाळांपैकी गुजराती, हिंदी, उर्दू आदी शाळांची पुस्तके वाटप करण्यात आली आहे. उर्वरित जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची पुस्तके केंद्रप्रमुखांच्या मार्गदर्शनाने वितरित केली जाणार आहेत. पटसंख्या वाढावी, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान आदी पुस्तकांचा समावेश आहे.