- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. पनवेल तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ५१ हजार ३३ लाभार्थी विद्यार्थी आहेत. त्यात मराठी, हिंदी, गुजराती, सेमी इंग्लिश, उर्दू या माध्यमाच्या पुस्तकांचा समावेश आहे. सद्य:परिस्थितीत १ लाख ५० हजार ५४५ इतकी पुस्तके आली आहेत, तर उर्वरित ७५ हजार पुस्तके लवकरच मिळणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.शासकीय शाळेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थीगळती होत असल्याने शासनाने पाच वर्षांपूर्वी सेमी इंग्लिश वर्ग सुरू केले. त्यामुळे शाळेच्या पटसंख्येत वाढ होण्यास मदत झाली आहे. यंदा कोरोनामुळे शाळा कधीपासून सुरू होणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शैक्षणिक वर्षाची तयारी करण्यात येत आहे.पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद २४८, खासगी शाळा ८१, महापालिका शाळा ११ अशा एकूण ३४० शाळांतील ५१ हजार ३३ विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, विज्ञान, हिंदी, बालभारती या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत १ लाख ५० हजार ५४५ पुस्तके आली आहेत, तर उर्वरित ७५ हजार पुस्तके लवकरच येणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले. यामध्ये १ ली ते ६ वीपर्यंतच्या सेमी इंग्लिश माध्यमाची गणित तसेच उर्दू विषयाची पुस्तके राहिली आहेत.ही पुस्तके पनवेल येथील के.व्ही. कन्याशाळेत सॅनिटायझर फवारणी करून ठेवण्यात आली आहेत. ती केंद्रप्रमुखाच्या मार्फत शाळेत पाठवण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर ती पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणारया वर्षी शासनाने पहिली ते सातवीपर्यंतच्या इयत्तेसाठी एकात्मिक पुस्तकाची निर्मिती केली आहे. यामध्ये ४ विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ओझे कमी होणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास त्याचा इतरत्र अवलंब केला जाणार आहे.
पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:17 PM