कैद्यांनी ओथंबलेल्या कारागृहांना दोन हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांचा बूस्टर
By नारायण जाधव | Published: October 12, 2023 04:03 PM2023-10-12T16:03:07+5:302023-10-12T16:03:25+5:30
तळोजा कारागृहालाही मिळणार वाढीव १७३ कर्मचारी-अधिकारी
नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी लाेकसंख्या आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यातील सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा कैदी ठेवण्यात येत आहेत. राज्यात ४५ ठिकाणी ६० कारागृहे असून राज्यभरातील कारागृहांची बंदी क्षमता २४ हजार ७२२ एवढी आहे. मात्र, प्रत्यक्षात जानेवारी २०२३ मध्ये संख्या वाढून ४१,०७५ झाली आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येला लगाम घालून कारागृहात होणारे अनुचित प्रकार टाळताना कारागृह प्रशासनाचे नाकीनऊ येत होते. यामुळे कारागृहांतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत होती. अखेर तिची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने कारागृह विभागासाठी सध्याच्या पदांव्यतिरिक्त दोन हजार पदांच्या निर्मितीस मान्यता दिली आहे. यात नवी मुंबईतील तळोजा कारागृहालाही वाढीव १७३ कर्मचारी-अधिकारी मिळणार आहेत.
राज्यात ६० कारागृहे
महाराष्ट्रात ९ मध्यवर्ती कारागृहे, २८ जिल्हा कारागृहे, १ विशेष कारागृह, १ किशोर सुधारालय, १ महिला कारागृह, खुली
कारागृहे १९ आणि १ आटपाडीची खुली वसाहत अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या कारागृहांसाठी १२ ऑगस्ट २०२२ राेजी ५०६८ पदांचा आकृतीबंध मंजूर केला होता. त्यास अखेर एक वर्षाने मंत्रिमंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या बैठकीत मान्यता दिली असून त्यानुसार गृहविभागाने खास कारागृह विभागासाठी २००० पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय ६ ऑक्टोबर २०२३ प्रसिद्ध केला आहे.
कारागृह कर्मचाऱ्यांचा ताण कमी होणार
राज्यातील सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. मात्र, त्यानुसार कर्मचारी-अधिकारी नसल्याने या अतिरिक्त कैद्यांच्या हालचालींवर वाॅच ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनावर मोठा ताण येत आहे. यातून अनेकदा कारागृहातून कैद्यांचे पलायन, आपसांत हाणामाऱ्या असे प्रकार सर्रास घडतात. यात कोणताही दोष नसतानाही कारागृहातील नेमणूक असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते. यामुळे ते नेहमीच तणावात ड्युटी करताना दिसतात. मात्र, आता अतिरिक्त कर्मचारी मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.
तळोजा, आर्थर रोड, येरवड्यात कुख्यात गुन्हेगार
राज्यातील पुण्याचे येरवडा, मुंबईचे आर्थर रोड आणि नवी मुंबईतील तळोजा कारागृहात अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ठेवले आहे. यात अरुण गवळी, अबू सालेम, डीएचएलएफचे वाधवान बंधू यासह अनेक कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. आता या तिन्ही कारागृहांना वाढीव कर्मचारी मिळणार आहेत.
तळोजाला मिळणारे वाढीव कर्मचारी
यातील तळोजा कारागृहाला २ परिचारक, १२५ शिपाई, २२ हवालदार, ५ सुभेदार, श्रेणी १ चे ४ व श्रेणी २ चे १० तुरुंग अधिकारी, १ उपअधीक्षक आणि लिपिक, मिश्रक, मानसशास्त्रज्ञ, मनोविकार तज्ज्ञ प्रत्येकी १ मिळणार आहेत.