पनवेलमधील गावातील सीमा गावकऱ्यांनी केल्या बंद ;बाहेरील व्यक्तीला प्रवेश मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:02 PM2020-03-24T12:02:22+5:302020-03-24T12:02:32+5:30
पनवेल पालिका क्षेत्रातील कोपरा गावात देखील गावक-यांनी सर्व सीमा बंदिस्त करीत बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंदीचा बोर्ड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ लावला आहे.
पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतःहून उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पनवेल तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीना बाहेरील व्यक्ती ,फेरीवाले यांना ग्रामपंचायत क्षेत्रात प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. पनवेल पालिका क्षेत्रातील कोपरा गावात देखील गावक-यांनी सर्व सीमा बंदिस्त करीत बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंदीचा बोर्ड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ लावला आहे.
याकरिता स्थानिक नगरसेवक ऍडव्होकेट नरेश ठाकूर यांच्यासह गावातील तरुण पुढे सरसावले आहेत. संचार बंदी झुगारणाऱ्या नागरिकांना ग्रामस्थ सूचना करीत आहेत. अत्यावशक्य परिस्थिती उद्भवली तर पोलिसांना संपर्क केला जात आहे. याकरिता गावातील तरुण याठिकाणी पहारा देत आहेत. ग्रामस्थांना देखील बाहेर न पडण्याच्या सूचना या तरुणांनी केल्या आहेत. सायन पनवेल महामार्गावर असलेल्या खारघर शहरातील कोपरा गावात मोठ्या प्रमाणात फेरीवाले, बाहेरील नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे काही होतकरू तरुणांनी हा निर्णय घेतला आहे.