नवी मुंबई : शहरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या दोघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ गुन्ह्यांची उकल झाली असून, यामधील ३ लाख ५६ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नवी मुंबईसह कल्याण, बदलापूर परिसरातही गुन्हे दाखल आहेत.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घरफोडी करणारी टोळी तुर्भे एमआयडीसी परिसरात वावरत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक शिखरे, उपनिरीक्षक सचिन जगताप यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला होता. या वेळी सदर ठिकाणी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली. मलंग उर्फ अब्दुल शेख (४३) व सुभाष गायकवाड (२८) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही ठाण्याचे राहणारे असून, सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर नवी मुंबईसह कल्याण व डोंबिवली परिसरातही घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. यानुसार पोलिसांच्या अधिक चौकशीत त्यांनी नवी मुंबईत केलेल्या आठ गुन्ह्यांची कबुली दिल्याचे उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. त्यामध्ये नेरुळ, एनआरआय व पनवेल पोलीस ठाण्यातील प्रत्येक दोन तर रबाळे व कामोठेमधील प्रत्येकी एक गुन्ह्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वरिल गुन्ह्यांमधील ३ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक
By admin | Published: January 10, 2017 7:02 AM