लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांपेक्षा जास्त झाली असताना, मनपाच्या आरोग्य विभागालाच घरघर लागली आहे. कोरोनाची जबाबदारी असणारे उपायुक्त डॉ.राहुल गेठे सुट्टीवर असून, त्यांनी पालिका सेवेतून मुक्त होण्यासाठी अर्ज केल्याची चर्चा आहे. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब सोनावणे हेही अजारी असल्याने सुट्टीवर आहेत. दोन्ही प्रमुख अधिकारी रजेवर असून, आयुक्त त्यांच्याविषयी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असताना, आरोग्य विभागातील दोन प्रमुख अधिकारी अनेक दिवसांपासून सुट्टीवर आहेत. आरोग्य विभागाचे उपायुक्त म्हणून डॉ. राहुल गेठे यांची शासनाकडून प्रतिनियुक्ती झाली आहे. प्रशासनाचा व शासकीय सेवेचा फारसा अनुभव नसलेल्या गेठे यांना एका मंत्र्यांच्या वशिल्याने कोविडची जबाबदारी देण्यात आली. सोशल मीडियावर गेठे यांनीही पालिका उपायुक्तपदाची जबाबदारी घेतल्याची पोस्ट टाकून स्वत:ची प्रसिद्धी करून घेतली होती, परंतु त्यांना प्रत्यक्षात फारसा प्रभाव पाडता आला नाही. आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या कामाचाही आढावा सुरू केला आहे. यानंतर, गेठे सुट्टीवर गेले असून, त्यांनी मनपा सेवेतून कार्यमुक्त होण्यासाठी अर्ज केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब सोनावणे हेही अनेक दिवसांपासून सुट्टीवर आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सुट्टी घेतली आहे. अँटिजेन चाचणी सुरू करण्यास विलंब केल्यामुळे आयुक्तांनी त्यांना नोटीस दिल्याची चर्चा आहे. मनपा आयुक्तांसह इतर अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र काम करत असताना, दोन प्रमुख अधिकारी सुट्टीवर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला असता, राहुल गेठे यांनी कार्यमुक्तीसाठी अर्ज केला आहे, असे समजते. माहिती घेऊन तपशील दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.उपायुक्तांची नियुक्तीच वादग्रस्त : पालिकेमध्ये आरोग्य विभागासाठी उपायुक्त हे पदच अस्तित्वात नाही. मनपाच्या स्थापनेपासून या पदावर कोणाची ही नियुक्ती झालेली नाही. डॉ.राहुल गेठे यांना शासनाने उपायुक्त म्हणून पालिकेत पाठविल्यानंतर त्यांना हे पद देण्यात आले. कोविड विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. नियुक्तीपासूनच हे पद वादग्रस्त ठरले आहे. उपमहापौर मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनीही यासाठी आक्षेप घेतला होता. यामुळे अनेक दिवस गेठे यांना कोणताच पदभार दिला नव्हता. गेठे हे यापूर्वी डॉ.डी.वाय. पाटील समूहात कार्यरत होते. यानंतर, ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहायक म्हणून ही कार्यरत होते. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. पालकमंत्र्यांच्या वशिल्याने त्यांची पालिकेत वर्णी लागल्याचे बोलले जात होते.