टास्कच्या बहाण्याने दोघांना लाखोंचा गंडा
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 4, 2023 08:16 PM2023-08-04T20:16:10+5:302023-08-04T20:16:51+5:30
पार्ट टाईम नोकरीचा शोध पडतोय महागात.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ऑनलाईन टास्क करून अधिक नफा कमवण्याचे आमिष दाखवून दोघांना लाखोंचा गंडा घातल्याचा घटना घडल्या आहेत. त्यात आयकर विभागाच्या निरीक्षकाचाही समावेश आहे. पार्ट टाईम व्यवसायातून अधिक कमाई करण्याच्या प्रयत्नात त्यांनी आहे ते देखील गमावले आहेत.
शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या संख्येने घडत आहेत. नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारीचे असलेले अज्ञान त्यास कारणीभूत ठरत आहे. त्यातच झटपट पैसे कमवण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांना गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकवत आहेत. अशाच प्रकारे आयकर विभागाच्या निरीक्षकाला देखील ४ लाख ७५ हजाराचा फटका बसला आहे. बेलापूर येथील रहिवाशी नवीन छिल्लर यांना पार्ट टाईम नोकरीतून अधिक पैसे कमवण्याचा मॅसेज आला होता. त्या व्यक्तींना त्यांनी प्रतिसाद दिला असता त्यांना टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. याद्वारे त्यांचा विश्वास संपादित करून त्यांच्याकडून ४ लाख ७५ हजार रुपये उकलण्यात आले. यानंतर अधिक पैशाची मागणी होऊ लागल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रकारे खारघर येथील सलमान खान यांना सायबर गुन्हेगारांनी ३६ लाख २३ हजाराचा गंडा घातला आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांना मॅसेज करून पार्ट टाइम कामातून दिवसाला ३ ते ४ हजार रुपये कमवण्याचा पर्याय सुचवला होता. त्याद्वारे खान यांनी संबंधितांवर विश्वास ठेवला ठेवून त्यांच्या खात्यावर ३६ लाख २३ हजार रुपये पाठवले होते. यानंतर मात्र त्यांना कोणताही मोबदला न मिळाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.