दोघांना ऑनलाईन १ कोटी १२ लाखाचा गंडा नफ्याचे आमिष पडले महागात; सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये अज्ञान
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 7, 2023 06:27 PM2023-12-07T18:27:55+5:302023-12-07T18:28:05+5:30
ऑनलाईन आमिषांना बळी पडल्याने दोघांची १ कोटी १२ लाखाची फसवणूक झाली आहे.
नवी मुंबई : ऑनलाईन आमिषांना बळी पडल्याने दोघांची १ कोटी १२ लाखाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाची पार्ट टाईम नोकरीच्या बहाण्याने २८ लाख ९० हजाराची फसवणूक झाली आहे. तर दुसऱ्याची टेडिंगच्या बहाण्याने ८० लाख १६ हजाराची फसवणूक झाली आहे.
सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये अद्यापही अज्ञान असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. त्यात सर्वसामान्यांसह उच्चशिक्षित अथवा बॅंकांमद्ये काम करणाऱ्यांचा देखील समावेश वेगवेगळ्या तक्रारींमधून उघड होत आहे. १०० ते २०० रुपयांना भुलून काहीजण लाखो रुपये अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून अज्ञात खात्यावर पाठवत आहेत. अशाच दोन घटना पुन्हा एकदा समोर आल्या असून दोघेही कोपर खैरणे परिसरात राहणारे आहेत. मकरंद गुंडगे यांना पार्ट टाईम कामाद्वारे पैसे कमवण्याचा मॅसेज आला होता. त्यामध्ये दोन ब्लॉगर्सला फॉलो करून २१० रुपये त्यांनी कमवले असता फायदा होत असल्याचा त्यांचा विश्वास बसला. यामुळे टप्प्या टप्प्याने त्यांनी २८ लाख ९० हजार रुपये भरले असता अधिक पैशाची मागणी होऊ लागली. दरम्यान नफा मिळायचे बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याचवेळी इन्कम टॅक्सच्या कारवाईचा धाक दाखवून देखील त्यांच्याकडून पैसे उकलण्यात आले.
त्याच प्रकारे जयप्रकाश मंदेरना यांना क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवण्याचा मॅसेज आला होता. त्याला प्रतिसाद दिल्यानं त्यांना वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यामध्ये माहिती भरून घेण्यात आली. त्यांच्याकडून नफा मिळेल या अपेक्षेने त्यांनी तब्बल ८३ लाख १६ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यावर पाठवले. मात्र दोघांनाही काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत असून त्यात गुन्हेगारांची पद्धत मात्र एकच आहे. त्यानंतरही अनेकांना खात्यात लाखो रुपये असताना शंभर, दोनशे रुपयांचा मोह अनावर होत असल्याने सायबर गुन्हेगारांचे फावताना दिसून येत आहे.