तळोजा पाचनंदचे दोन्ही फेज समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:21 AM2019-12-23T01:21:54+5:302019-12-23T01:22:00+5:30

रस्त्यांची दुरवस्था, धुळीचे साम्राज्य : पायाभूत सुविधांकडे सिडकोचे दुर्लक्ष

Both phases of Taloja Pachanand are in trouble | तळोजा पाचनंदचे दोन्ही फेज समस्यांच्या गर्तेत

तळोजा पाचनंदचे दोन्ही फेज समस्यांच्या गर्तेत

Next

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : सिडकोच्या तळोजा पाचनंद मधील दोन्ही फेजमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे येथील लोकवस्तीसुध्दा वाढू लागली आहे. असे असले तरी या परिसरात पायाभूत सुविधांचा मात्र पुरता बोजवरा उडाल्याचे दिसून येते. रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तसेच धुळीचे साम्राज्य पसरल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करण्यात सिडकोकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.

नावडे आणि त्यानंतर तळोजा पाचनंद ही नागरी वसाहत उभारण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सिडकोने हाती घेतलेले आहे. तळोजा पाचनंद हा नोड दोन फेजमध्ये विभागला गेला आहे. त्यापैकी फेज-२ हा संपूर्ण दुर्लक्षित असल्याचे राहिला आहे. येथे पुरेसे पाणी येत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही या वसाहतीत पाणी मिळत नव्हते. या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. परंतु त्यांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन सिडकोकडे नाही. त्यामुळे भविष्यात या परिसरात मोठ्याप्रमाणात पाणीसमस्या भेडसावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यातील खडी आणि माती बाहेर आली आहे. पाचनंद कॉर्नर सेक्टर २४ येथे रस्त्याची चाळण झाली आहे. समोरच मेट्रोचे मोठे यार्ड आहे. त्यामुळे डंपर, ट्रक या अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. भरधाव वेगाने वाहणाºया ट्रक आणि डंपर मुळे येथील रहिवाशांना जीवमुठीत घेवून चालावे लागते. त्याचबरोबर या जड वाहनाने येथील रस्ते डॅमेज करून टाकले आहेत. बांधकामासाठी माती रेती, खडी वाहिली जात आहे. ती रस्त्यावर सांडल्याने आणखी दुरावस्था होत आहे. ग्रीन कॉर्नर सेक्टर २६ येथेही रस्ता चांगला नसल्याने वाहनांना कसरत करावी लागत आहे. फेज - १ कडे जाणाºया रस्त्याची देयनीय अवस्था आहे. मेट्रो करिता जो पूल बांधण्यात आला आहे. त्याच्याखाली रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. या परिसरातील पावसाळी नाल्यांत बेसुमार गवत वाढले आहे. फेज-१ मध्ये पाण्याच्या पाईप लाईन्स तसेच केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. पदपथांची सुद्धा अवस्था चांगली नाही. काही प्लॉट वर सिडकोने कुंपण घातलेले आहे. मात्र आत मध्ये जंगल वाढलेले आहे. मुलांना खेळण्या साठी क्रीडांगणचा अभाव तळोजाच्या दोन्ही फेजमध्ये दिसून येतो.

पदपथावर कार्यालय
तळोजा फेज दोन मध्ये अनेक इमारतीचे काम सुरू आहे. बिल्डरांनी बांधकाम साहित्य रस्ते आणि पदपथावर टाकून दिले आहे. सेक्टर १६ येथील फ्लॉट क्रमांक २0 आणि २९ या इमारतीचे बांधकाम चालू आहे. तिथे पदपथावरच बिल्डर कडून कंटेनर टाकून बुकिंग आॅफिस सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिका आणि सिडकोचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

तळोजा पचनंद फेज १ तसेच फेज २ मधील वसाहतीत सुविधा पुरवण्यात येत आहेत. या ठिकाणी नवीन वसाहत होत आहे. वसाहतीत बरीच कामे चालू आहेत. त्यामुळे गरजेनुसार टप्या टप्याने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
- मिलिंद म्हात्रे, कार्यकारी अभियंता सिडको

सिडकोने तळोजा फेज १ व फेज २ या वसाहती निर्माण करत आहे. पण त्यासाठी लागणा-या सुविधांचा वानवा आहे. पाणी समस्या , रस्ते , स्वच्छतागृह आदी समस्या भेडसावत आहेत. याबाबत वारंवार सिडकोच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत . तर त्याबाबत सिडकोने लक्ष द्यावे यासाठी पाठपुरावा ही केला जात आहे. - हरेश केणी, नगरसेवक

स्वच्छतागृहांचा अभाव
तळोजा पाचनंद फेज- १ येथे मेट्रोचा डेपो आहे. आणि फेज -२ मध्ये कामासाठी यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. तसेच शेकडो इमारतींचे बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागात दररोज हजारो मजूर कामाला येतात. तसेच फेरीवाले, विक्रेते, रिक्षा चालक यांचीही संख्या मोठी आहे. परंतु येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. सेक्टर-८ येथे सिडकोने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले आहे. त्यावर महापालिकेच्या नावाने रंगरंगोटी करण्यात आली आहे. परंतु येथे पाणी नसल्याने गैरसोय होत आहे.

Web Title: Both phases of Taloja Pachanand are in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.