घार, कावळ्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही नर-मादी कोकिळेस उपचारासाठी पक्षीमित्रांनी केले रेस्क्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 04:32 PM2023-11-06T16:32:26+5:302023-11-06T16:32:37+5:30
चिरनेर येथील शेतात रविवारी (५) दोन कोकिळा अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्यानंतर शेतकऱ्यांनी परिसरातील परिचित असलेल्या पक्षीमित्राला पाचारण केले होते.
मधुकर ठाकूर -
उरण : चिरनेरच्या एका शेतावर अत्यंत जखमी अवस्थेत सापडलेल्या नर आणि मादी कोकिळेस पक्षीमित्र रवींद्र फुंडेकर यांनी पुढील उपचारासाठी फ्रेंड ऑफ नेचर संघटनेचे पदाधिकारी राजेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
चिरनेर येथील शेतात रविवारी (५) दोन कोकिळा अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्यानंतर शेतकऱ्यांनी परिसरातील परिचित असलेल्या पक्षीमित्राला पाचारण केले होते.पक्षीमित्र रवींद्र फुंडेकर यांनी शेतावर जाऊन पाहणी केली.या पाहणीत त्यांना नर आणि मादी असलेले दोन कोकिळ पक्षी जखमी अवस्थेत निपचिप पडून असलेल्या अवस्थेत आढळून आले.कावळा, किंवा घारीच्या हल्ल्यात हे दोन्ही नर मादी कोकिळ पक्षी जबर जखमी झाले आहेत.मादी कोकिळेचा पाय तुटला आहे.तर नर कोकिळेच्या दोन्ही पंखांना जखमा झाल्याने त्यालाही उडता येत नाही.
अशा या जखमी अवस्थेत सापडलेल्या दोन्ही नर आणि मादी कोकिळेवर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.जखमी प्राणी अथवा पक्षी यांच्यावर पुण्यातील एका रेस्क्यू इस्पितळातच उपचार केले जातात.यामुळे या दोन्ही जखमी अवस्थेत सापडलेल्या नर आणि मादी कोकिळेस उपचारासाठी पक्षीमित्र रवींद्र फुंडेकर यांनी फ्रेंड ऑफ नेचर संघटनेचे पदाधिकारी राजेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले असल्याचे सांगितले.तर जखमी अवस्थेत सापडलेल्या दोन्ही नर आणि मादी कोकिळेस उपचारासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पुण्यातील रेस्क्यू इस्पितळात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राजेश पाटील यांनी दिली.
आतापर्यंत रवींद्र फुंडेकर यांनी परिसरात जखमी अवस्थेत सापडलेल्या मोर, जंगली बदके, लाव्हा पक्षी, साळुंकी, होला, कोकीळ अशा बऱ्याच जातीच्या पक्षांना जीवनदान दिले असल्याची माहिती पक्षीमित्र राजेश पाटील यांनी दिली.