तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 12:05 AM2019-07-20T00:05:37+5:302019-07-20T00:05:42+5:30

तुर्भे एमआयडीसीमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे.

Both of them were arrested in the Tihar killings case | तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक

तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक

googlenewsNext

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे मध्यप्रदेशमधील सतना येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी जुन्या वादातून तिघांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.
तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी गावातील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना १२ जुलैला मध्यरात्री घडली होती. धारदार शस्त्र व हातोड्याचे घाव घालून तिघांना मारण्यात आले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, सेबु हनिफ खान-पठाण (२५) व शेरू हनिफ खान-पठाण (२४) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही मूळचे मध्यप्रदेशचे असून ज्या भंगाराच्या गोडाऊनमध्ये तिहेरी हत्याकांड घडले, त्याच ठिकाणी ते यापूर्वी कामाला होते. गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात सीसीटीव्ही तपासले असता, घटनेच्या दिवशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास संशयित दोघे जण के. के. आर. रोडने तुर्भे रेल्वेस्थानकाच्या दिशेने जाताना दिसून आले. त्याद्वारे पोलिसांनी अनुक्रमे तुर्भे व टिळकनगर रेल्वेस्थानक रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता दोघे जण एक्स्प्रेसने मध्यप्रदेशमधील सतनाच्या दिशेने गेल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राहुल राख व उपनिरीक्षक योगेश वाघमारे यांना तातडीने सतनाला पाठवण्यात आले. याचदरम्यान तुर्भे एमआयडीसी पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशमध्येच मयतांच्या नातेवाईकांकडे संशयितांची चौकशी करत होते. या वेळी राख व वाघमारे यांना सतना रेल्वेस्थानकात फलाटावर १५ पैकी दोन सीसीटीव्हीमध्ये संशयितांच्या हालचाली दिसून आल्या, तसेच तांत्रिक तपासातही संशयितांचे सतना येथील एका मोबाइल नंबरवर बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संशयित आरोपी हे पुन्हा सतना स्थानकात येणार या अपेक्षेने सहायक निरीक्षक राख व उपनिरीक्षक वाघमारे यांच्या पथकाने तिथेच ठाण मांडले. तर आरोपींनी ज्या पद्धतीने तिघांची हत्या केली होती, त्यावरून ते क्रूर असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे कारवाई वेळी पोलिसांवरही ते हल्ला करण्याची शक्यता होती, यामुळे मध्यप्रदेशमध्येच तपास करत असलेले उपनिरीक्षक गणेश फरताडे व हवालदार अजहर मिर्झा यांनाही सतना स्थानकात बोलवण्यात आले. त्यांच्याकडून वेगवेळ्या ठिकाणी सापळा लावलेला असताना रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर दोघेही आढळून आले असता, त्यांना पकडण्यात आले.
>तिकिटांच्या तपासणीतून सुगावा
तुर्भेनंतर टिळकनगर स्थानकातील सीसीटीव्हीत दोघे संशयित आरोपी दिसून आले. यामुळे त्या ठिकाणावरून एक्स्प्रेसने ते राज्याबाहेर गेल्याचा संशय होता. त्याकरिता पोलिसांनी त्या ठिकाणावरून काढण्यात आलेल्या सर्वच तिकीट तपासल्या. त्यामध्ये बहुतांश तिकीट एक किंवा तीनपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्रित काढलेल्या होत्या. केवळ दोनच तिकीट सतनाच्या काढण्यात आलेल्या. तर संशयित आरोपीही दोनच असल्यामुळे केवळ त्या तिकिटांच्या आधारे पोलिसांनी सतना रेल्वेस्थानक गाठले असता आरोपी हाती लागले.
>जुन्या वादातून केली हत्या
अटक केलेले दोघे भाऊ नोकरीच्या शोधात तुर्भे एमआयडीसी परिसरात आले होते. दिवसभर नोकरी शोधल्यानंतर रात्रीच्या विश्रांतीसाठी घटना घडलेल्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी सेबू याने यापूर्वी काम केले होते; परंतु मालकाकडून राजेशकुमार पाल, इरशाद खान व नौशाद खान यांच्यामार्फत होणाऱ्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडली होती. मात्र, घटनेच्या दिवशी तो पुन्हा त्या ठिकाणी आला असता त्यांच्यात वाद झाला. या वादात सेबू व शेरू यांनी तिथलेच धारदार शस्त्र व हातोडीने वार करून तिघांची हत्या करून पळ काढला होता.
>टीसी बनून घेतले ताब्यात
सतना रेल्वेस्थानकात सापळा लावल्यानंतर संशयित दोघांना थेट पोलीस म्हणून पकडण्याचा प्रयत्न केल्यास ते गर्दीमधून पळू शकले असते, यामुळे सहायक निरीक्षक राख व उपनिरीक्षक वाघमारे यांनी टीसी बसून त्यांच्याकडे तिकीटची चौकशी केली. त्यानंतर फरताडे व मिर्झा यांच्या मदतीने त्यांना आरपीएफच्या कार्यालयात नेऊन ताब्यात घेतले.
तपास पथकाची नावे
या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा उपआयुक्त अजय कदम, अमोल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई, शिरीष पवार, विजय कादबाने, सुनील शिंदे, सहायक निरीक्षक संतोष जाधव, सचिन मोरे, राहुल राख, दीपक डोंब, उपनिरीक्षक विजय चव्हाण, योगेश वाघमारे, सुनील सावंत, सम्राट वाघ आदीचे पथक तयार करण्यात आले होते.

Web Title: Both of them were arrested in the Tihar killings case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.