तळा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला - तटकरे
By admin | Published: January 5, 2017 06:01 AM2017-01-05T06:01:40+5:302017-01-05T06:01:40+5:30
तालुक्याच्या निर्मितीनंतर २००२ साली पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांची निर्मिती झाली. या मागील तीन निवडणुकांमध्ये युवक महिला आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन
अलिबाग : तालुक्याच्या निर्मितीनंतर २००२ साली पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांची निर्मिती झाली. या मागील तीन निवडणुकांमध्ये युवक महिला आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन, तळा तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवला याचा अभिमान वाटत आहे. सर्व धर्मीयांनी ताकद उभी केली म्हणून शंभर टक्के यश मिळाले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी के ले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा तळा तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी त्यांनी भाषणात शिवसेना नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगावमध्ये दिल्ली मुंबई कॅरिडॉरला विरोध करत शेतकऱ्यांच्या मागे ठाम राहणार, अशी भूमिका मांडली आणि आता सत्तेत आल्यावर हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी पहिली सही असेल तर ती शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची.नगरपालिका निवडणुकीदरम्यान रोहा येथे नोटाबंदीला विरोध करत, केंद्रीय मंत्री यांनी राजीनामा देण्याची भाषा केली आणि आपली तुलना सी. डी. देशमुखांबरोबर केली. जैतापूरला आतून विरोध करायचा आणि सरकारमध्ये वेगळी भूमिका मांडायची. स्वत:च्या सावलीला भिणारे जनतेला काय न्याय मिळवून देणार? असा खडा सवाल त्यांनी केला. या मेळाव्यासाठी समाजकल्याण सभापती गीता जाधव, कार्याध्यक्ष प्रमोद घोसाळकर, पं.स. सभापती शेवंता अडखळे आदी उपस्थित होते.