तळा, पोलादपूर तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त
By admin | Published: January 5, 2017 06:02 AM2017-01-05T06:02:47+5:302017-01-05T06:02:47+5:30
‘तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त होत असताना, हा तालुका प्रगत आणि मजबूत तालुका होईल, अशी आशा बाळगतो,’ असे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
तळा : ‘तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त होत असताना, हा तालुका प्रगत आणि मजबूत तालुका होईल, अशी आशा बाळगतो,’ असे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले. ते तळा पंचायत समिती आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद रायगड आयोजित स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
‘आज तळा तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त होत आहे, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिला तालुका हागणदारीमुक्त जाहीर करण्याचा पहिला मान मला तळा तालुक्याला देण्याचा मिळाला. तळा तालुक्याचा एकंदर इतिहास पाहता, जरी हा तालुका छोटा असला, दुर्गम असला, तरी शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतो. उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे यांनी या तालुक्यात विविध स्तरावर चांगले काम करून पाया रचला आहे. सर्व शासकीय कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक या सर्वांच्या सहकार्यातून हा तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला, ही त्याची फलश्रुती आहे. यावरून तळे तालुका प्रगत आणि मजबूत तालुका होईल, अशी मला खात्री आहे. सर्वांच्या सहकार्याने हे प्रतीक आहे,’ असे नार्वेकर यावेळी म्हणाले.
आज येथे उपसभापती राऊत यांनी काही समस्या मांडल्या. वैद्यकीय अधिकारी एन एन एम, तालुका वैद्यकीय अधिकारी पं. समितीमध्ये रिक्त पदे, शिक्षण विभागात रिक्त पदे आहेत. तसेच फर्निचर कमी प्रमाणात आहे. आरोग्य कर्मचारी यांचा तीन महिने पगार नाही. यासारख्या समस्या मी जातीने लक्ष घालून सोडविण्यासाठी प्रयत्न करीन. आता शासनाने आम्हाला वैद्यकीय अधिकारी भरण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पहिले वैद्यकीय अधिकारी तळा प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासनही नार्वेकर यांनी या वेळी दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळा पं. स.चे सभापती शेवंता अडखळे या होत्या. यावेळी राजिप समाज कल्याण सभापती गीता जाधव, उपसभापती चंद्रकांत राऊत, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे, संपर्क अधिकारी समाज कल्याण रायगड लेंडी, पंचायत समिती सदस्य नाना गौड, भारती इंगळे, जयवंत गायकवाड, स्वदेश फाऊंडेशनचे रवींद्र मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे यांनी तालुक्याबाबत सखोल माहिती देताना वेळोवेळी ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. त्या त्यावेळी ग्रामसेवक, सरपंच, ग्रामस्थ, विविध खात्यांमधील कर्मचारी स्वत: गटविकास अधिकारी परदेशी या सर्वांनी खूप परिश्रम घेतल्यामुळेच आजचे हे यश दिसत आहे, असे साळुंखे यांनी सांगितले. (वार्ताहर)
पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
1‘जल्लोष हागणदारीमुक्तीचा’ कार्यक्र माने पोलादपूरचे नक्कीच प्रगतीकडे पाऊल जात आहे, असे गौरवोद्गार काढून उमरठ व कुडपन या गावांचा कोकण पर्यटनात सामावेश केला असून, यापुढे पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी लक्ष देणार, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी ‘जल्लोष हागणदारीमुक्तीचा’ या कार्यक्र मात केले.
2या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘हा तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असला, तरी कोणतेही घर शौचालयाविना राहू नये, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांनी विशेष प्रयत्न केले. मात्र, हागणदारीमुक्तीचे सातत्य टिकवायचे असेल तर पाण्याची गरज भागविणे महत्त्वाचे आहे, यासाठी तालुका टंचाईमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासनाच्या प्रत्येक उपक्र मात आमचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. यासाठी शासनाने या दुर्गम तालुक्याकडे लक्ष देऊन सर्व योजना राबवाव्यात,’ असे आवाहन केले. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आले.
3या वेळी पंचायत समिती पोलादपूर येथून सर्व सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व पळचिल विद्यालयाचे लेझिमपथक यांच्या लवाजम्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके,चंद्रकांत कळांबे, प.स.सभापती अर्चना कुंभार, जिल्हा परिषद सदस्या अपर्णा जाधव, प.स.सदस्य तथा माजी सभापती दिलीप भागवत, अनीता शिंदे, जिल्हा स्वच्छता समन्वयक जयवंत गायकवाड, गट विकासअधिकारी विनायक म्हात्रे, स्वदेशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सर्व सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला.