नागोठणे : येथील ग्रामपंचायतीकडून अंबा नदीवरील घाटाशेजारी नागरिकांना बसण्यासाठी शेड बांधण्यात आले आहे. त्यात आसन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ही जागा सध्या नदी पलीकडून मद्यप्राशन करून आलेल्या मद्यपींसाठी विश्रांती स्थान ठरली आहे. नशेत या मद्यपींकडून आपसात हाणामारीचे प्रकारसुद्धा नेहमी घडत असल्याने सामान्य जनांना हे ठिकाण सध्या त्रासदायक ठरत आहे. पोलीस ठाण्यात नव्याने कार्यभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांनी यात लक्ष घालून या मद्यपींचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येथील अंबा नदीचा घाट हवेशीर असल्याने शहरातील अनेक नागरिक या ठिकाणी काही काळ येऊन बसत असतात. याच नदीच्या पलीकडे हातभट्टी दारूचा व्यवसाय अविरत चालू असतो. उत्पादन शुल्क विभागाने या भागात अनेक ठिकाणी धाडी टाकून हातभट्टीचे व्यवसाय जमीनदोस्त केले असले, तरी या ठिकाणी २४ तास चालू असलेल्या हातभट्टी व्यवसायाकडे या कार्यालयाकडून दुर्लक्षच करण्यात आले आहे. त्यामुळे नागोठण्यातील मद्यपींची या ठिकाणी २४ तास वर्दळ असते. मद्यप्राशन केल्यानंतर जवळपास सर्वच मद्यपी परत शहरात येताना अंबा घाटावर येऊन बिनधास्तपणे या बाकड्यांवर येऊन आसनस्थ होत असतात किंवा त्यावर आडवेसुद्धा होत असतात. नशेच्या भरात या मद्यपींची आपसात बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान काही वेळेला हाणामारीतही होत असते. असाच प्रकार २ दिवसांपूर्वी येथे घडला असून, त्यात एका मद्यपीच्या हाताला दुखापतसुद्धा झाली होती. एकांत लक्षात घेऊन याच ठिकाणी जुगाराचा अड्डासुद्धा चालत असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांनी एकदा मोहीम हाती घेऊन या मद्यपींचा येथील वावर बंद करण्यासाठी कठोर कारवाईचा बडगा उचलावा, अशी मागणी होत आहे. त्यानिमित्ताने हवापालट करण्यासाठी येणाऱ्या शहरातील सामान्यजनांसाठी येथे जागा उपलब्ध होऊ शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
अंबा नदी घाटावर मद्यपींचा उच्छाद
By admin | Published: December 26, 2016 6:21 AM