एपीएमसीतील लाकडी पेट्यांसह खोके पुन्हा ऐरणीवर
By नारायण जाधव | Published: March 30, 2024 06:09 PM2024-03-30T18:09:37+5:302024-03-30T18:12:43+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पेट्या आणि खोक्यांमुळे परिसरात अपघाताला आमंत्रण मिळत असून, आगीच्या दुर्घटनाही होत आहेत. या पेट्या आणि खोक्यांवर नवी मुंबई महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली असली असली तरी ती तोंडदेखली न करता मुळात त्यांनाच येथून कायमचे हटवावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने केली आहे. या सर्व्हिस रोडसह पदपथ बाजार समितीच्या ताब्यात असल्याबाबतचे पत्र नगर रचना विभाग, नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच दिले आहे. यानंतर बाजार समितीने नियमबाह्यरीत्या काही लोकांना लाकडी पेट्या आणि खोके ठेवण्यासाठी येथे जागा दिली. परंतु, बऱ्याच वेळा मार्केटमध्ये या खोक्यांमुळे आग लागलेली आहे.
मनुष्यहानी व वित्तहानीस जबाबदार कोण
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून, मोठी आग लागून मनुष्यहानी व वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सर्व्हिस रोडसह पदपथालगतची जागा लाकडी पेट्या व खोके व्यावसायिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे सेक्टर २० परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनधिकृत लाकडी पेट्या व खोके व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांसह बाजार समितीच्या सचिवांना दिले आहे.