नवी मुंबई - वापरात नसलेल्या पालिका शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी बोनकोडे येथील अनेक वर्षांपासून अर्थवट बांधकाम स्थिती असलेल्या पालिका शाळेसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत मुलाच्या पालकांनी केली आहे.
सौरभ सुनील चौधरी (१२) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो त्याच्या इतर दोन मित्रांसोबत वापरात नसलेल्या पालिका शाळेच्या आवारात क्रिकेट खेळत होता. यावेळी शाळेच्या आवारातच रिक्षा उभी करण्यासाठी एका रिक्षा चालकाने शाळेचे लोखंडी गेट उघडले. परंतु त्याने ते गेट बंद न केल्याने सौरभ व त्याचे मित्र ते गेट बंद करण्यासाठी त्याठिकाणी गेले. यावेळी हे लोखंडी गेट त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये सौरभ व त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच दोघा जखमींना उपचारासाठी वाशीतील पालिका रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु सौरभची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला फोर्टीज रुग्णालयात नेण्याचे डॉक्टरांनी सुचवले. त्यानुसार सौरभचे नातेवाईक त्याला जखमी अवस्थेत फोर्टीज रुग्णालयात घेऊन गेले असता, त्याठिकाणी बेड खाली नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी पालिकेतून पाठवले असून सौरभची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून देखील त्याला दाखल करून घेण्यात उशीर केला गेला. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने सौरब याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचे मामा संतोष पाटील यांनी केला आहे. तसेच शाळेच्या गेटचे काम निकृष्ठ झाल्याने ते कोसळून हा अपघात घडला. याप्रकरणी ठेकेदारावर देखील कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. बोनकोडे येथील पालिकेच्या सदादर शाळेचे बांधकाम अनेक वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे.