हातोड्याचे घाव घालत प्रियकर-प्रेयसीने कॅबचालकाला संपवले; धक्कादायक घटनेचा असा झाला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:12 IST2025-04-07T13:11:42+5:302025-04-07T13:12:35+5:30
हत्येनंतर दोघेही कॅब घेऊन पुणे, नाशिकला गेले असता तेथे झालेल्या अपघातांमुळे या खुनाचा उलगडा झाला.

हातोड्याचे घाव घालत प्रियकर-प्रेयसीने कॅबचालकाला संपवले; धक्कादायक घटनेचा असा झाला उलगडा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : उलवे येथे एका कॅबचालकावर हातोड्याने हल्ला करत डोळे फोडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रेयसीसह प्रियकरावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येनंतर दोघेही कॅब घेऊन पुणे, नाशिकला गेले असता तेथे झालेल्या अपघातांमुळे या खुनाचा उलगडा झाला.
मोहगावात राहणाऱ्या संजय पांडे (वय ४४) यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. तीन दिवसांनी त्यांच्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. डोक्यावर हातोडीचे घाव घालून, तसेच डोळे फोडून त्यांची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता. ही हत्या २ एप्रिलला झाल्याची शक्यता आहे. रिया सरकन्यासिंग (वय १९) व तिचा प्रियकर विशाल शिंदे (२१) यांनी ही हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर उलवे पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रिया, विशाल हे दोघे पांडेच्या कॅबमधून नियमित पुण्याला जात असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती. मात्र, घटनेच्या दिवशी पांडेच्या घरी रिया असताना तिथे विशाल आला.
ब्लॅकमेल केल्याचा आरोप
पांडे आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रियाने केल्यानंतर दोघांनी मिळून पांडेची हत्या केली. हत्येनंतर त्याचीच कार व मोबाइल घेऊन दोघेही पुण्याला गेले. मात्र, तिथे अपघात झाल्याने संबंधित वाहनचालक त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाताना त्याला चकवा देऊन ते नाशिकला पळाले.
त्यांनी दिली खुनाची कबुली
शनिवारी रात्री नाशिकमध्येही अपघात झाल्यानंतर ते दोघे पोलिसांच्या हाती लागले. कारमालकाबद्दल केलेल्या चौकशीत त्यांनी पांडेच्या हत्येची कबुली दिली. नाशिक पोलिसांनी याबाबत कळविले असता पांडेच्या घरझडतीमध्ये मृतदेह मिळाल्याचे सहायक पोलिस आयुक्त विशाल नेहूल यांनी सांगितले.
कार चालविता येत नसल्याने अपघात
पांडेची कार घेऊन दोघे पळून गेले असता त्यांना कार चालविता येत नसल्याने त्यांच्याकडून पुण्यात अपघात झाला. यावेळी समोरील वाहनधारक त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. मात्र, त्यांना चकवा देऊन ते नाशिकला पळाले. तिथेही त्यांच्याकडून अपघात झाला असता ते पोलिसांच्या हाती लागले. गाडी पांडेच्या नावावर असल्याचे चौकशीत समोर आले असता हा प्रकार उघड झाला. त्यानंतर उलवे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.