पनवेल : घर खरेदीसाठी दिवाळीचा मुहूर्त हा सर्वात चांगला समजला जातो. नवी मुंबई, पनवेल हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. लाखो घरे खाजगी विकासक उभारत आहेत. सर्वसामान्यांना परवडणारी घरे म्हणून ग्राहकांचा कल गावठाणात तसेच नैना क्षेत्रात उभारलेल्या घर खरेदीसाठी असतो, मात्र दिघा परिसरात झालेल्या कारवाईचा धसका तसेच सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाने सुरू केलेल्या मोहिमेचा धडाका यामुळे गावठाण व नैना क्षेत्रातील घर खरेदीला ब्रेक लागला आहे. यंदाची दिवाळी बांधकाम व्यावसायिकांना थंड गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे.सिडकोने नवी मुंबई शहर वसविले आहे. खाजगी विकासक तसेच सिडकोने याठिकाणी घरांची निर्मिती केली आहे. मात्र गावठाण क्षेत्रातील घरांच्या किमती याठिकाणच्या घरांपेक्षा निम्म्या असल्याने सर्वसामान्य ग्राहक हा गावठाणातील घरांना आपली पसंती देतो. मात्र नुकतीच दिघा येथे झालेल्या कारवाईमुळे अनेक जण बेघर झालेत. राहत्या घरातून बाहेर काढून दिघ्यामध्ये इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. नवीन ग्राहक येत नसल्यामुळे दिवाळीत बुकिंगला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैना प्रकल्प आल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना नैनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बहुतांशी बिल्डरांना बांधकाम थांबवावे लागले आहे. शेकडो इमारती याठिकाणच्या परिसरात उभारल्या गेल्या आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक तयार झालेली घरे विकण्याच्या प्रतीक्षेत आहेत. स्वस्त: घरांचे डेस्टिनेशन म्हणून नैना क्षेत्राकडे पाहिले जाते . मात्र विकास आराखडा तयार न झाल्यामुळे याठिकाणी शेकडो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. सिडकोने याठिकाणी कारवाईला सुरुवात केली आहे त्यामुळे घरांच्या खरेदीवर याचा परिणाम झालेला दिसून येत आहे.
‘नैना’ क्षेत्रातील घर खरेदीला ग्राहकांकडून ब्रेक
By admin | Published: November 16, 2015 2:17 AM