महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 11:34 AM2024-06-08T11:34:10+5:302024-06-08T11:35:02+5:30
शिक्षक-पदवीधर निवडणुकीत उभे केले एकमेकांविरोधात उमेदवार
नवी मुंबई : कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघासह मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भाजप व उद्धवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी समोरासमोर येताच जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तीन मतदारसंघांसाठी एकूण ५२ अर्ज दाखल झाले असून, महायुती व महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज भरण्याच्या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, किसन कथोरे, संजय केळकर, संजीव नाईक, संदीप नाईक यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे गटाचे किशोर जैन यांनीही अर्ज सादर केला. कोकण भवन परिसरात भाजप व उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येताच जोरदार घोषणाबाजी केली.
पदवीधरसाठी २२, शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २२ अर्ज दाखल झाले. महाविकास आघाडीमधील काँग्रेस व शरद पवार गट, उद्धवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये १० अर्ज दाखल झाले असून, त्यात उद्धवसेना, शिंदेसेना, भाजपच्या उमेदवारांचा समावेश आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्ज दाखल झाले आहेत. यात उद्धवसेना, समाजवादी रिपब्लिकन पार्टी, अजित पवार गट, काँग्रेस, शिंदेसेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप
राज्यातील लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजप कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी शुक्रवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवनाथ दराडे यांना आव्हान दिले आहे.
भाजपचे अधिकृत उमेदवार दराडे यांनीही कोकण भवन येथे पक्षनेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय केळकर, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील राणे आदी नेते उपस्थित होते. तसेच, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, आमदार भगवानराव साळुंखे, राज्य कार्यालयीन मंत्री निरंजन गिरी, अध्यक्ष सुहास हिर्लेकर, उपाध्यक्ष बबन कातकडे, भारत काकडहेही यावेळी उपस्थित होते.
दराडे यांनीही शिक्षक चळवळीत २५ वर्षे कार्यरत असल्याचा दावा करत, आतापर्यंत शिक्षकांच्या विविध प्रश्रांसाठी शेकडो आंदोलने केल्याचे सांगितले.