भू-सुरुंगाच्या स्फोटाने घराच्या भिंतीला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:17 AM2018-05-17T06:17:07+5:302018-05-17T06:17:07+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी उलवे टेकडी सपाटीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान बुधवारी दुपारी भू-सुरुंगाचे दगड ओवळे गावातील घरावर कोसळले.
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी उलवे टेकडी सपाटीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान बुधवारी दुपारी भू-सुरुंगाचे दगड ओवळे गावातील घरावर कोसळले. यात एका घराच्या भिंतीला भगदाड पडले असून, सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. या घटनेमुळे संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी ठेकेदाराला धारेवर धरून काम थांबविले.
टेकडी सपाटीकरणासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात भू-सुरुंग लावले जात आहेत. बुधवारी दुपारी १ वाजता केलेल्या स्फोटातील दगड दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील वरचे ओवळे गावातील विलास घरत यांच्या घराच्या भिंतीवर आदळून आरपार गेले. यादरम्यान विलास घरत यांच्या आई सहा महिन्यांच्या लहान मुलीला घेऊन घरात झोपल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या प्रकारामुळे संतापलेल्या महिलांनी ब्लास्टिंग करणाऱ्या कंत्राटदाराला मारण्याचा प्रयत्न केल्याने, संबंधित ठेकदाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या वेळी वरच्या ओवळे ग्रामस्थांनीही पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुपारी २ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ब्लास्टिंगच्या कामांमध्ये कंत्राटदाराकडून वारंवार हलगर्जीपणा केला जातो, त्यामुळे कंत्राटदारावर कारवाईची मागणी ग्रामस्थ करीत होते. या घटनेसंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशीही वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.