अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तरी पण या सुचनेकडे नागरिकांनी दुर्लक्ष करीत रोडवर उतरत आहेत. त्याचबरोबर प्रवास करत आहेत. म्हणून कळंबोली पोलिसांनी पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग रोखला आहे. हे सारे सांगली, सातारा, पुणेच्या गावी जात होते.
कोरोनाचे रुग्ण मुंबईत वाढत आहे . तीन जणांचा मृत्यूही झाला आहे. राज्य सरकारने नागरिकांना बाहेर न पडण्याचे वारंवार सांगितले जात आहे. रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यास पूर्ण प्रतिसादही मिळाला. रात्री पासून जमावबंदीही लागू करण्यात आली. सोमवारी मात्र सर्व नियम पयदळी तुडवल्याचे दिसून आले. बाहेर गावी जाण्यासाठी घराबाहेर पडणा-यांची संख्या वाढत आहे. पनवेल सायन महामार्गावरही सकाळपासूनच वाहनांची गर्दी दिसून आली. त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश गाकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अंकूश खेडकर यांनी सकाळी साडे अकरा वाजता पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग बंद केला. अत्यावश्यक असणाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात आले. तर इतरांना यु टर्न मारावा लागला.
नागरिकांची पोलिसांसोबत हुज्जत
अत्यावश्यक नागिकांना पुणे महामार्गावरुन एन्ट्री दिली जात आहे. इतर नागरिकांना पोलिसांकडून अटकाव केला जात आहे. जमलेल्या नागरिकांनी वाहने सोडण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तरी देखील पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त लावला आहे. पुण्याकडे कोणतीही गाडी सोडण्यात येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.