खेळाची अभ्यासक्रमाशी सांगड घालावी- ब्रायन लारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 03:11 AM2019-07-05T03:11:15+5:302019-07-05T03:11:35+5:30
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने ब्रायन लाराला क्रिकेटमधील कामगिरीसाठी डॉक्टरेट बहाल केली.
नवी मुंबई : विद्यार्थ्यांनी खेळ आणि अभ्यासक्रम यांची योग्य सांगड घालावी. ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम केले की यश मिळतेच, असे मत वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे. आयुष्याचा प्रवास उलगडून सांगताना भारतीयांच्या आपुलकीने भारावून गेल्याचे मतही त्याने व्यक्त केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने ब्रायन लाराला क्रिकेटमधील कामगिरीसाठी डॉक्टरेट बहाल केली. नेरूळमधील विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमात लाराने सांगितले की, वडिलांचा त्याग व स्वत:ला सिद्ध करण्यासाठी केलेल्या परिश्रमामुळे यश मिळविता आले. विद्यार्थ्यांनी खेळ व अभ्यासक्रम दोन्हींची योग्य सांगड घालावी. जीवनाचे ध्येय निश्चित करून परतीचे दोर कापून टाकून समोर येईल त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. येणाऱ्या प्रसंगांना धैर्याने सामोरे गेले की यश मिळतेच असेही त्याने सांगितले. लहानपणीच्या आठवणी, वेस्ट इंडिजमधील खेळाडूंना खेळताना आलेले चांगले- वाईट अनुभव याचीही माहिती त्याने यावेळी दिली. भारतीयांच्या प्रेम व आपुलकीने भारावून गेलो असल्याचेही मतही त्याने यावेळी व्यक्त केले. डॉ.डी. वाय. पाटील स्टेडियमची पाहणी करून तेथील सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. येथे चांगल्या सुविधा असून भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत होईल असे मतही व्यक्त केले.
डॉ. विजय पाटील यांनीही वर्ल्ड कप सुरू असून समालोचनाची जबाबदारी लारा याच्यावरही आहे. व्यस्त वेळापत्रक असतानाही त्याने वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी अॅबी कुरविला, शिवानी पाटील, डॉ. शिरीष पाटील, पी. व्ही. भागवत व इतर मान्यवर उपस्थित होते.