नवी मुंबई : अर्जाची पोचपावती देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली आहे. त्याने एका भाडेकरूकडे पोलीस पडताळणी अर्जाची पोचपावती देण्यासाठी लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सानपाडा पोलीस ठाण्यात सापळा रचून त्याच्यावर कारवाई केली.प्रशांत चव्हाण असे कारवाई केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याने पोलीस पडताळणीसाठी आलेल्या भाडेकरूचा अर्ज स्वीकारून पोचपावती देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागितली होती. सदर भाडेकरूने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. त्यानुसार उपअधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनाजी जळक, सहायक उपनिरीक्षक तायडे, हवालदार सीमा जाधव यांच्या पथकाने बुधवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला होता. या वेळी तीनशे रुपयांची लाच घेताना चव्हाणला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पडताळणी प्रक्रियेचा गैरफायदा घेत, काही पोलीस ठाण्यात प्रतिअर्ज ३०० ते ५०० रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)
लाच घेणाऱ्या पोलिसाला अटक
By admin | Published: December 23, 2016 3:29 AM