कोठडीतला त्रास टाळण्यासाठी लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:27 AM2018-05-04T01:27:35+5:302018-05-04T01:27:35+5:30

जेल कोठडीतील आरोपीचा त्रास टाळण्यासाठी त्याच्या नातेवाइकांकडे लाच मागणाऱ्या दोघा पोलीस शिपायांवर कारवाई करण्यात आली आहे.

A bribe to prevent harassment | कोठडीतला त्रास टाळण्यासाठी लाच

कोठडीतला त्रास टाळण्यासाठी लाच

Next

नवी मुंबई : जेल कोठडीतील आरोपीचा त्रास टाळण्यासाठी त्याच्या नातेवाइकांकडे लाच मागणाऱ्या दोघा पोलीस शिपायांवर कारवाई करण्यात आली आहे. २० हजारांपैकी १५ हजार स्वीकारताना तळोजा कारागृहाच्या आवारात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर ही कारवाई केली.
महेश यादव (३४) व सोमनिंग कट्यापा कांबळे (२७) अशी कारवाई झालेल्या तळोजा कारागृहातील दोघा पोलीस शिपायांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात खारघर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे वडील एका प्रकरणातून तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. यादरम्यान त्यांना कोठडीत कसल्याही प्रकारचा त्रास नको असल्यास त्यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पाच हजार रुपये यापूर्वीच त्यांनी स्वीकारले होते. मात्र, त्यानंतर उर्वरित रकमेसाठी त्यांच्याकडून तक्रारदाराकडे मागणी केली जात होती. यासंदर्भात तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत बुधवारी तळोजा कारागृह आवारात सापळा रचण्यात आला होता.
या वेळी लाचेच्या रकमेचा १५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता स्वीकारताना महेश यादव याला रंगेहात पकडण्यात आले. तसेच त्याचा सहकारी सोमनिंग कांबळे याच्यावरही कारवाई करण्यात आली. या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक धनाजी जळक अधिक तपास करत आहेत. या प्रकारावरून गुन्हेगार अथवा त्यांच्या नातेवाइकांसोबत आर्थिक हितसंबंध ठेवून तळोजा कारागृहात सोयी-सुविधा पुरवल्या जात असल्याचीही बाब समोर आली आहे.

Web Title: A bribe to prevent harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.