लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : इमारत दुर्घटनाप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला जामिनाला मदत करण्यासाठी व दुसऱ्या गुन्ह्यात न अडकवण्यासाठी साडेतीन लाखाची लाच घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांना अटक केली आहे. तक्रारदाराकडून यापूर्वी १४ लाख रुपये घेऊनही अधिक ५ लाखांची मागणी करून साडेतीन लाखांवर तडजोड केली होती. उलवे येथील राहत्या इमारतीखाली लाच घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.
एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांच्या विरोधात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या वडिलांना बेलापूर इमारत दुर्घटना प्रकरणात अटक झाली आहे. मात्र, ते केवळ गुंतवणूकदार असतानाही विकासक व जागामालक यांच्यासोबत त्यांनाही गुन्ह्यात गोवले गेल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे. या गुन्ह्यात सहकार्यासाठी कदम यांच्याकडून थेट तक्रारदार यांच्याकडे ५० लाखाची मागणी करून पहिल्यांदा १२ लाख व दुसऱ्यांदा २ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. परंतु, दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी अधिक ५ लाख मागितले असता तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. कदम यांनी तक्रारदाराला मंगळवारी रात्री उलवेतील राहत्या इमारतीखाली बोलावले होते. तेथे लाच घेताना त्यांना अटक झाली. ते ज्या एनआरआय पोलिस ठाण्यात कार्यरत होते, त्याच ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
कारवाईनंतर घेतली घराची झडती
कदम यांच्यावरील कारवाईनंतर त्यांचे घर व पोलिस ठाण्याची झडती घेण्यात आली. त्यामध्ये घरातून ४८ लाखांची रोकड, तर पोलिस ठाण्यातील केबिनमधील कपाटातून ८.७० लाखांची रोकड मिळाल्याचे समजते.
----००००----