पनवेल : पनवेल शहरापासून जवळपास २० ते २२ किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या करंबेळी येथील नदीवरील छोटा पूल कोसळला आहे. गेले दोन ते चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला असल्याची माहिती येथील आदिवासी बांधवांनी दिली आहे.येथील करंबेळीवाडीत ३५ घरे असून लोकवस्ती जवळपास १५० हून अधिक आहे. पूल कोसळल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. वाडीतील सात ते आठ विद्यार्थ्यांनाही पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांनाही पूर आलेला आहे. विद्यार्थ्यांना पाण्यातून ये-जा करावी लागत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच येरमाल, भल्याची वाडी, मोठी करंबेळी या आदिवासीवाडीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात भातशेती याच पुलाच्या पलीकडे आहे. हा पूल कोसळल्यामुळे त्यांचीही अडचण होणार आहे.
करंबेळी येथील पूल कोसळला; वाहतुकीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 1:00 AM