सिडको बांधणार संरक्षण भिंत : भूखंडावरील अतिक्रमणांना लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 02:17 AM2019-08-02T02:17:55+5:302019-08-02T02:18:22+5:30
सिडको बांधणार संरक्षण भिंत : झोपड्या, डेब्रिज हटविण्याची मागणी
कळंबोली : कळंबोली सिडको वसाहतीतील मोकळ्या भूखंडावर होणारे अतिक्रमण थांबवण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी तारेचे कुंपण घातले जाणार आहे. लवकरच सर्व मोकळे भूखंड सिडकोकडून बंदिस्त केले जाणार असल्याने पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, असा विश्वास सिडकोकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कळंबोली सिडको वसाहतीत सिडकोचे अनेक भूखंड रिकामे, पडीक आहेत. मोकळ्या जागेचा वापर होत नसल्याने येथे झोपड्यांचे अतिक्रमण होत आहे. तसेच कचरा, डेब्रिजही टाकले जाते. तर काही ठिकाणी झाडे-झुडपेही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. गृहनिर्माण, वाणिज्य, मैदान, क्रीडांगण, उद्यान इतर अनेक कारणांकरिता राखीव असलेले भूखंड मोकळे आहेत. महापालिका झाली असली तरी या भूखंडांची मालकी सिडकोकडेच आहे. त्यामुळे या जागेवर अतिक्रमण रोखण्याकरिता मोकळ्या भूखंडावर संरक्षण भिंत बांधण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. कळंबोलीतील सेक्टर १३ येथील सिडको कार्यालयासमोर असलेल्या भूखंडावर झोपड्यांनी बस्तान मांडले आहे. येथे मोठ्या प्रमाणात डेब्रिजही टाकण्यात आले आहे. सिडको अतिक्रमण विभागाकडून पाच ते सहा वेळा झोपड्यांवर हातोडा मारण्यात आला; परंतु काही दिवसांतच पुन्हा झोपड्या उभारल्या जात असत, त्यामुळे संरक्षण भिंत तसेच तारेचे कुंपण करण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे.
भूखंडावर झोपड्या, डेब्रिज जैसे थे
सिडकोकडून संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे; परंतु भूखंडावर असलेल्या झोपड्या, डेब्रिज जैसे थे असल्याने संरक्षण भिंतीचा उपयोग कशासाठी होणार आहे, असा प्रश्न रहिवासी हर्षल भोसले यांनी उपस्थित केला आहे. बांधकाम करण्याआधी झोपड्या व डेब्रिज हटवणे, अपेक्षित असताना तसे न करताच भिंत बांधली जात आहे.